Poland : रशियाने युक्रेनवर डागलेले क्षेपणास्त्र पोलंडमध्ये पडले, २ ठार, जी-७, NATO नेत्यांनी बोलावली तातडीची बैठक | पुढारी

Poland : रशियाने युक्रेनवर डागलेले क्षेपणास्त्र पोलंडमध्ये पडले, २ ठार, जी-७, NATO नेत्यांनी बोलावली तातडीची बैठक

पुढारी ऑनलाईन डेस्क : रशियाकडून युक्रेनवर क्षेपणास्त्रे हल्ले सुरुच आहेत. दरम्यान, रशियाने युक्रेनच्या दिशेने डागलेले क्षेपणास्त्र बुधवारी पोलंडच्या (Poland) हद्दीत जाऊन पडले. यामुळे पोलंडमध्ये दोघांचा मृत्यू झाला असल्याचे वृत्त द असोसिएटेड प्रेसने अमेरिकेच्या गुप्तचर अधिकार्‍याचा हवाला देऊन दिले आहे. तर पोलंडकडून सांगण्यात आले आहे की बुधवारी पहाटे रशियन बनावटीचे क्षेपणास्त्र देशाच्या पूर्वेकडील भागात पडले. यात दोघांचा मृत्यू झाला आहे. युक्रेनच्या सीमेजवळ असलेल्या प्रझेवोडो या गावाजवळ हा हल्ला झाल्याचे वृत्त पोलंडमधील माध्यमांनी दिले आहे.

दरम्यान, पोलंडच्या परराष्ट्र मंत्रालयाने पुष्टी केली की रशियन बनावटीचे रॉकेट त्याच्या हद्दीत कोसळले. ज्यामुळे दोन लोक ठार झाले आहेत, असे वृत्त एएफपीने दिले आहे. दरम्यान, रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने या हल्ल्यामागे त्यांचा हात नसल्याचे म्हटले आहे. पोलंडचे राष्ट्राध्यक्ष आंद्रेजेज डुडा यांनी, क्षेपणास्त्र नेमके कोणी डागले याबद्दल कोणताही माहिती अद्याप मिळालेली नसल्याचे म्हटले आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी म्हटले आहे की रशियाकडून क्षेपणास्त्र डागले जाण्याची शक्यता कमी आहे. दरम्यान, या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर जी२० शिखर परिषदेसाठी इंडोनेशियात असलेले सात देश (Group of Seven) आणि नाटो नेत्यांनी आपत्कालीन बैठक घेतली. या घटनेबाबत नाटो नेत्यांनी चिंता व्यक्ती केली आहे.

पोलंड (Poland) सरकारने सांगितले की या घटनेचा तपास केला जात आहे आणि लष्करी सज्जता वाढवण्यात आली आहे. बायडेन यांनी पोलंडच्या तपासाला सहकार्य करण्याची ग्वाही दिली आहे. पोलंडमध्ये येऊन पडलेले क्षेपणास्त्र रशियन बनावटीचे असल्याचे पोलंडच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. “आम्ही संयमी भूमिका घेतली आहे. ही एक कठीण परिस्थिती आहे.” असे पोलंडचे राष्ट्राध्यक्ष डुडा यांनी म्हटले आहे. या घटनेनंतर पोलंडचे परराष्ट्र मंत्री झ्बिग्नीव राऊ यांनी रशियन राजदूताला समन्स बजावून तत्काळ स्पष्टीकरण देण्याची मागणी केली आहे.

 हे ही वाचा :

Back to top button