Rishi Sunak UK PM | ब्रिटनमध्ये ऋषीराज, ५७ वे पंतप्रधान म्हणून सुनक यांची अधिकृत घोषणा | पुढारी

Rishi Sunak UK PM | ब्रिटनमध्ये ऋषीराज, ५७ वे पंतप्रधान म्हणून सुनक यांची अधिकृत घोषणा

लंडन : पुढारी ऑनलाईन; भारतीय वंशाचे ऋषी सुनक (Rishi Sunak UK PM) यांची आज (दि.२५) ब्रिटनचे नवे पंतप्रधान म्हणून किंग चार्ल्स III यांनी अधिकृत घोषणा केली. लिझ ट्रस यांच्या राजीनाम्यानंतर किंग चार्ल्स यांनी सरकार स्थापन करण्यासाठी हुजूर पक्षाचे नेते (Conservative Party leader) ऋषी सुनक यांना बकिंगहॅम पॅलेसमध्ये आमंत्रित केले. त्यानंतर किंग चार्ल्स यांच्याकडून सुनक यांची अधिकृतरित्या पंतप्रधानपदी नियुक्ती करण्यात आली. ऋषी सुनक हे ब्रिटनचे ५७ वे पंतप्रधान बनले आहेत. ते या वर्षीचे तिसरे पंतप्रधान आहेत आणि दोन शतकांतील सर्वात तरुण पंतप्रधान म्हणून त्यांनी १० डाउनिंग स्ट्रीटवर प्रवेश केला आहे.

माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी पंतप्रधानपदाच्या शर्यतीतून माघार घेतल्याने सुनक यांची या पदाच्या निवडीची औपचारिकता बाकी होती. जी काल सोमवारी पार पडली. ग्रेट ब्रिटनचे ते पहिले आशियायी पंतप्रधान ठरले आहेत. लिझ ट्रस यांनी केवळ ४४ दिवसांतच पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला होता. हुजूर पक्षाचे पक्षप्रमुख बनल्यानंतर सुनक हे सात आठवड्यांतील तिसरे पंतप्रधान आहेत. तर लिझ ट्रस यांची पंतप्रधान म्हणून ब्रिटनच्या इतिहासात सर्वात कमी कारकिर्द राहिली.

देशाचे नेतृत्व करणे हा माझ्यासाठी मोठा सन्मान – लिझ ट्रस

आज १० डाउनिंग स्ट्रीट बाहेर लिझ ट्रस यांनी निरोपाचे भाषण केले. त्यात त्यांनी देशाचे नेतृत्व करणे हा माझ्यासाठी मोठा सन्मान असल्याचे म्हटले. त्यांच्या सरकारने कष्टकरी कुटुंबांना मदत करण्यासाठी तात्काळ आणि निर्णायकपणे काम केले असल्याचे सांगत त्यांनी ऋषी सुनक यांना शुभेच्छा दिल्या. आपल्या मतदारसंघात आता अधिक वेळ देणार असल्याच्या त्या म्हणाल्या. त्यानंतर ट्रस यांनी किंग चार्ल्स यांच्याकडे पंतप्रधानपदाचा राजीनामा सुर्पूद केला.

सोमवारी हुजूर पक्षाच्या संसदीय दलाने सुनक यांची नेता म्हणून निवड केली. सुनक यांना सुमारे २०० खासदारांचा पाठिंबा मिळाला. तर प्रतिस्पर्धी पेनी मॉर्डॉन्ट यांना केवळ २६ खासदारांचा पाठिंबा मिळाल्याने त्यांनी पंतप्रधानपदाच्या शर्यतीतून माघार घेत असल्याचे जाहीर केले. यानंतर आपसूकच सुनक यांचा ब्रिटनच्या पंतप्रधानपदी विराजमान होण्याचा मार्ग मोकळा झाला.

राजकारणातील ऋषी

ऋषी सुनाक हुजूर पक्षातील हुकमाचा एक्का आहेत. २०१५ मध्ये त्यांना यॉर्क्सच्या रिचमंड मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली. ऋषी तेव्हापासून या जागेवर सातत्याने निवडून येत आहेत. बोरिस जॉन्सन यांनी ऋषी यांना २०१९ मध्ये ‘चिफ सेक्रेटरी ऑफ ट्रेझरी’ म्हणून नियुक्त केले होते. या नियुक्तीच्या दुसर्‍याच दिवशी त्यांना प्रिव्ही कौन्सिलचे सदस्यपदही देण्यात आले. १३ फेब्रुवारी 2020 रोजी मंत्रिमंडळाच्या पुनर्रचनेत त्यांना अर्थमंत्री करण्यात आले.

rushi sunak

कोण आहेत ऋषी सुनक?

ऋषी सुनक यांचे आई-वडील भारतातील पंजाबचे मूळ रहिवासी आहेत. ते ब्रिटनमध्ये स्थायिक झाले. ऋषी हे भारतीय सॉफ्टवेअर कंपनी इन्फोसिसचे सहसंस्थापक नारायण मूर्ती यांचे जावई आहेत. ऋषी यांच्या मातोश्री ब्रिटनच्या राष्ट्रीय आरोग्य विभागात फार्मासिस्ट आहेत. ऋषी यांचा जन्म हॅम्पशायरयेथे झाला. अमेरिकेतील स्टॅनफोर्ड विद्यापीठातून त्यांनी एमबीए केले. ऑक्सफर्ड विद्यापीठातून राजकारण, तत्त्वज्ञान आणि अर्थशास्त्राचे शिक्षण घेतले. ऋषी यांचे वडीलही याच दोन्ही विद्यापीठांचे पदवीधर आहेत. ऋषी यांच्या पत्नीचे नाव अक्षता मूर्ती आहे. २००९ मध्ये त्यांचे लग्न झाले होते. दोघांना कृष्णा आणि अनुष्का या दोन मुली आहेत. राजकारणात येण्यापूर्वी ऋषी यांनी गोल्डमन सॅक्स बँक तसेच हेज फंडमध्ये या वित्तीय आस्थापनांतून मोठ्या जबाबदार्‍या पार पाडल्या आहेत. पुढे त्यांनी स्वत:चे एक गुंतवणूक प्रतिष्ठानही स्थापन केले होते. ते व्यवसायाने बँकर असून, माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या मंत्रिमंडळात अर्थमंत्री होते. (Rishi Sunak UK PM)

 हे ही वाचा :

Back to top button