

लंडन/नवी दिल्ली, वृत्तसंस्था : भारतावर ब्रिटनचे राज्य होते, तेव्हा स्वातंत्र्याच्या मागणीवर प्रतिक्रिया नोंदविताना तत्कालीन ब्रिटनचे पंतप्रधान चर्चिल म्हणाले होते, 'भारताला स्वातंत्र्य दिले, तर सत्ता गुंडांच्या ताब्यात जाईल. भारतीय नेतृत्व भुशाने भरलेल्या पुतळ्यासारखे फारच कमकुवत आहे!' चर्चिल यांच्या या वक्तव्याचा ब्रिटनच्या पंतप्रधानपदी सुनाक यांच्या सोमवारी झालेल्या निवडीने जणू सूड उगवला आहे.
तसा अनेक अंगांनी आज हा सूड उगवला जात आहे. ब्रिटिश राज्यात जितके गोरे भारतात राहात असत, तितक्यांच्या तुलनेत 10 पटीने अधिक भारतीय आज ब्रिटनमध्ये रहिवासाला आहेत. 1941 च्या जनगणनेनुसार त्यावेळी भारतात 1 लाख 44 हजार ब्रिटिश भारतात राहात होते. ब्रिटनमधील मूळ भारतीयांची लोकसंख्या आज 16 लाखांवर आहे. शिक्षण, व्यवसाय, राजकारण प्रत्येक क्षेत्रात भारतीयांचा दबदबा आहे. ब्रिटनमधील सरकार मग ते कुणाचेही असो, केंद्रीय मंत्रिमंडळात एक तरी भारतीय चेहरा जरूर असतो. भारतीयांची विश्वासार्हता केवळ तेथील भारतीयांमध्येच आहे, असे नाही, तर ब्रिटिश तसेच अन्य वांशिक गटाच्या लोकांमध्ये भारतीयांबद्दल विश्वासाची भावना आहे. ऋषी सुनाक यांच्या लोकप्रियतेची तुलना त्यामुळेच टोनी ब्लेअर यांच्याशी केली जाते.
राजकारणातील ऋषी
ऋषी सुनाक हुजूर पक्षातील हुकमाचा एक्का आहेत. 2015 मध्ये त्यांना यॉर्क्सच्या रिचमंड मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली. ऋषी तेव्हापासून या जागेवर सातत्याने निवडून येत आहेत.
बोरिस जॉन्सन यांनी ऋषी यांना 2019 मध्ये 'चिफ सेक्रेटरी ऑफ ट्रेझरी' म्हणून नियुक्त केले होते. या नियुक्तीच्या दुसर्याच दिवशी त्यांना प्रिव्ही कौन्सिलचे सदस्यपदही देण्यात आले. 13 फेब्रुवारी 2020 रोजी मंत्रिमंडळाच्या पुनर्रचनेत त्यांना अर्थमंत्री करण्यात आले.
ब्रिटनमधील भारतीय
* लोकसंख्येच्या 2.3 टक्के
* 42.9 टक्के मूळ भारतीयांचा जन्म ब्रिटनमध्ये
* 33.4 टक्के भारतीय लोकसंख्या 18 ते 34 वयोगटातील
* 31 टक्के भारतीय अभियंता, वकील अशा व्यवसायांत
* 26.4 टक्के भारतीय नागरी, आरोग्य, शिक्षण सेवेत
* 43 टक्के भारतीय कुटुंबांचे उत्पन्न सरासरी 32.5 लाखांवर
* 74 टक्के भारतीयांची ब्रिटनमध्ये स्वत:ची घरे