Pakistani Journalist Killed : पाकिस्तानी पत्रकाराची केनियामध्ये गोळ्या घालून हत्या; पत्नीचा दावा | पुढारी

Pakistani Journalist Killed : पाकिस्तानी पत्रकाराची केनियामध्ये गोळ्या घालून हत्या; पत्नीचा दावा

इस्लामाबाद; पुढारी ऑनलाईन : केनियामध्ये एका पाकिस्तानी पत्रकाराची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. पोलिसांच्या चकमकीत पत्रकाराचा मृत्यू झाल्याची माहिती पत्रकाराच्या पत्नीने सोमवारी दिली. या वर्षाच्या सुरुवातीला, पाकिस्तानच्या सुरक्षा यंत्रणांनी या पत्रकारावर देशद्रोहाचा आणि देशविरोधी कारवायात गुंतल्याचे आरोप केले होते. तेव्हापासून पत्रकार आणि एआरवाय या टीव्हीचे अँकर असणारे अर्शद शरीफ (वय 49) हे वेगवेगळ्या देशात रहात होते. अर्शद शरीफ हे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचे निकवटर्ती असल्याचे मानले जाते. अर्शद यांच्या पत्नी जावेरिया सिद्दीकी यांनी अर्शद शरीफ यांच्या निधनाच्या वृत्ताला ट्वीटरच्या माध्यमातून दुजोरा दिला आहे. (Pakistani Journalist Killed)

अर्शदच्या पत्नीने ट्वीटमध्ये तिने म्हटले आहे “मी आज माझा मित्र, पती आणि माझा आवडता पत्रकार गमावला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याच्यावर केनियामध्ये गोळी झाडण्यात आली होती. आमच्या खासगी जीवनाचा आदर करा आणि ‘ब्रेकिंग’ (बातमी) च्या नावाखाली कृपया आमचे कौटुंबिक फोटो, वैयक्तिक तपशील आणि हॉस्पिटलमधील त्यांची शेवटची छायाचित्रे शेअर करू नका.” (Pakistani Journalist Killed)

असोसिएटेड प्रेस या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, अर्शद शरीफ यांची केनिया पोलिसांनी रविवारी रात्री गोळ्या झाडून हत्या केली. केनियाच्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका मुलाच्या अपहरणाच्या संदर्भात शोध सुरू असताना “चुकीच्या ओळखीमुळे” शरीफ यांना गोळ्या घालण्यात आल्या. (Pakistani Journalist Killed)

पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयाच्या कार्यालयाचे प्रवक्ते असीम इफ्तिखार यांनी सांगितले की, केनियातील पाकिस्तानी उच्चायुक्तालय स्थानिक अधिकाऱ्यांकडून माहिती गोळा करत आहे, असे वृत्त पाकिस्तानच्या डॉन वृत्तपत्राने दिले आहे. इम्रान खान यांच्या तेहरीक-ए-इन्साफ पक्ष आणि त्यांच्या वरिष्ठ नेत्यांनी अर्शद शरीफ यांच्या हत्येचा निषेध केला आहे आणि या संदर्भात सविस्तर चौकशीची मागणी केली आहे. (Pakistani Journalist Killed)


अधिक वाचा :

Back to top button