North Korea fires missile | उत्तर कोरियाने जपानवरुन डागले क्षेपणास्त्र, लोक अंडरग्राउंड, बुलेट ट्रेन सेवा थांबवली | पुढारी

North Korea fires missile | उत्तर कोरियाने जपानवरुन डागले क्षेपणास्त्र, लोक अंडरग्राउंड, बुलेट ट्रेन सेवा थांबवली

टोकियो : पुढारी ऑनलाईन; उत्तर कोरियाचे हुकुमशाहा किम जोंग उन यांनी शेजारी देशांविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. मंगळवारी सकाळी उत्तर कोरियाने चक्क जपानवरुन क्षेपणास्त्र डागत (North Korea fires missile) चाचणी घेतली. यामुळे जपानमध्ये खळबळ उडाली. उत्तर कोरियाच्या या आगळिकीमुळे जपानने वॉनिंगचा सायरन वाजवत लोकांना सुरक्षित ठिकाणी राहण्याची सूचना द्यावी लागली. तसेच जपानच्या उत्तर भागात बुलेट ट्रेन सेवा थांबवण्यात आली आहे.

उत्तर कोरियाने गेल्या १० दिवसांत ५ क्षेपणास्त्र चाचण्या घेतल्या आहेत. मंगळवारी उत्तर कोरियाने डागलेल्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राने प्रशांत महासागरात पडण्यापूर्वी सुमारे ४,५०० किमी (२,८०० मैल) प्रवास केला. २०१७ नंतर उत्तर कोरियाने जपानवरून सोडलेला हे पहिले क्षेपणास्त्र आहे. या क्षेपणास्त्र चाचणीमुळे जपानने त्यांच्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी अलर्ट जारी केला. संयुक्त राष्ट्राने उत्तर कोरियाला बॅलेस्टिक आणि अण्वस्त्रांची चाचणी घेण्यास मनाई केली आहे. कोणतीही पूर्व सूचना किंवा सल्लामसलत न करता इतर देशांच्या दिशेने किंवा त्यावरुन क्षेपणास्त्र डागणेदेखील आंतरराष्ट्रीय नियमांचे उल्लंघन असल्याचे संयुक्त राष्ट्राने म्हटले होते.

उत्तर कोरियाच्या क्षेपणास्त्रामुळे होक्काइडो बेटासह जपानच्या उत्तर भागातील लोक सायरनच्या आवाजाने सतर्क झाले. “उत्तर कोरियाने क्षेपणास्त्र सोडले आहे. कृपया इमारतींमध्ये किंवा भूमिगत व्हा.” अशा सूचना नागरिकांना देण्यात आल्या. दरम्यान, उत्तर कोरियाने डागलेले बॅलिस्टिक क्षेपणास्त्र जपानपासून दूर प्रशांत महासागरात जाऊन पडले आणि यामुळे कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

जपानकडे चोख प्रत्युत्तर देण्याची क्षमता, उत्तर कोरियाला इशारा

उत्तर कोरियाच्या या क्षेपणास्त्राने (North Korea fires missile) आतापर्यंतचा सर्वात लांब पल्ला पार केला. जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांनी उत्तर कोरियाच्या या कृतीवर निषेध नोंदवला आहे. उत्तर कोरियाचे वर्तन हिंसक स्वरुपाचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तर संरक्षण मंत्री यासुकाझू हमादा यांनी, जपानकडे चोख प्रत्युत्तर देण्याची क्षमता असल्याचा इशारा उत्तर कोरियाला दिला आहे.

हे ही वाचा :

Back to top button