…तर पुढील वर्षी जग मंदीच्या खाईत : जागतिक बँकेचा गंभीर इशारा | पुढारी

...तर पुढील वर्षी जग मंदीच्या खाईत : जागतिक बँकेचा गंभीर इशारा

...तर पुढील वर्षी जग मंदीच्या खाईत - जागतिक बँकेचा गंभीर इशारा

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : महागाई नियंत्रणासाठी जगभरातील मध्यवर्ती बँका व्याजदर वाढवत आहेत; पण याचा नकारात्मक परिणाम जगाच्या अर्थव्यवस्थेवर पुढील वर्षी दिसतील. यातून जागतिक अर्थव्यवस्था  मंदीच्या खाईत ढकलली जाईल, असा इशारा जागतिक बँकेने दिला आहे. याचा फार मोठा परिणाम विकसनशील देशांवर होईल, असेही बँकेनं म्हटलं आहे. (World Bank warns of Recession)

विविध देशांतील मध्यवर्ती एकामागून एक व्याजदर वाढवत आहेत, अशी घटना गेल्या पाच दशकांत घडलेली नाही. पुढील वर्षीसुद्धा हा ट्रेंड सुरू राहील, अशी शक्यता आहे, असेही जागतिक बँकेने नमूद केले आहे.  जागतिक बँकेने एका अहवालात हा उहापोह केला आहे. “असे जरी असले तरी व्याजदरात होणारी वाढ आणि वेगवेगळे धोरणात्मक उपाय महागाई नियंत्रणात आणणे आणि ती कोरोना महामारीच्या पूर्वीच्या स्थितीत नेणे अशक्यप्राय वाटते,” अशी टिप्पणी जागतिक बँकने केली आहे.

२०२३पर्यंत एकूण व्याजदरात ४ टक्के इतकी मोठी वाढ होण्याची शक्यता गुंतवणूकदार व्यक्त करत आहेत; पण जोपर्यंत विस्कळीत झालेली पुरवठा साखळी आणि रोजगार बाजारातील दबाव कमी होत नाही, तोपर्यंत महागाई कमी येणार नाही. सध्याची व्याजदरातील वाढ गृहित धरली तरी Global Core Inflation Rate हा ५ टक्के इतका राहील. ५ टक्के हा दर जागतिक महामारीच्या पूर्वीच्या वर्षापेक्षा तब्बल दुप्पट आहे, असेही जागतिक बँकेने स्‍पष्‍ट केले आहे. त्यामुळे महागाई नियंत्रणात आणण्यासाठी मध्यवर्ती बँका पुन्हा व्याजदर वाढवतील. यामुळे जर वित्तव्यवस्थेत ताण निर्माण झाला तर जगाच्या GDP ०.५ टक्के इतका कमी होईल.

जागतिक बँक समूहाचे अध्यक्ष डेव्हिड मालपास यांनी म्हटले आहे की, “जागतिक अर्थव्यवस्था वेगाने मंदावत आहे. जर जागतिक अर्थव्यवस्था अधिक मंदावली तर आणखी देश मंदीच्या संकटात सापडतील. जे विकसनशील देश आहेत, त्यांच्यासाठी आणि तेथील जनतेसाठी ही धोक्याची घंटा ठरेल, अशी आम्हाला भीती वाटते.” देशांनी महागाई नियंत्रणात आणण्‍यासाठी वस्तू आणि सेवांचा उपभोग घटवण्यापेक्षा उत्पादकता वाढ, गुंतवणूक वाढवणे, भांडवलाचे योग्य वाटप याकडे लक्ष दिले पाहिजे, अशा उपाययोजना जागतिक बँकेने सुचवल्या आहेत.

हेही वाचा : 

Back to top button