जाणून घ्या अर्थजगतातील महत्त्वपूर्ण घडामोडी | पुढारी

जाणून घ्या अर्थजगतातील महत्त्वपूर्ण घडामोडी

          प्रीतम मांडके (मांडके फिनकॉर्प)

  •  गत सप्ताहात निफ्टी व सेन्सेक्स निर्देशांकामध्ये अनुक्रमे एकूण 293.90 अंक व 989.81 अंकांची वाढ होऊन दोन्ही निर्देशांक 17833.35 अंक व 59793.14 अंकांच्या पातळीवर बंद झाले. निफ्टीमध्ये एकूण 1.68 टक्के, तर सेन्सेक्समध्येदेखील एकूण 1.68 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली. 29 जुलैनंतर प्रथमच 10 वर्षे कालावधीच्या सरकारी रोख्यांनी (10 ूशरी र्सेींशीपाशपीं लेपव ूळशश्रव) साप्ताहिक पातळीवर मोठी घसरण नोंदवली. रोख्यांमध्ये आठवड्यात एकूण 6 बेसिस पॉईंटसची घट होऊन 10 वर्षे कालावधीच्या सरकारी रोख्यांचा भाव शुक्रवारअखेर 7.1669 टक्क्यांवर बंद झाला. आंतरराष्ट्रीय पातळीवर कच्च्या खनिज तेलाच्या भावामध्ये झालेली घसरण प्रामुख्याने भारतीय अर्थव्यवस्थेसाठी अनुकूल ठरत असल्याने रोख्यांच्या भावामध्ये घसरण होत असल्याचे तज्ज्ञांचे मत.

 

  •  गत सप्ताहात आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाच्या भावाने मागील सात महिन्यांचा तळ गाठला. 25 जानेवारीनंतर प्रथमच 87.24 डॉलर प्रती बॅरल या न्यूनतम स्तराला ब्रेंट क्रुडने स्पर्श केला आणि सप्ताहाअखेर पुन्हा ब्रेंट क्रुड 90 डॉलर प्रती बॅरल किमतीवर स्थिरावले. खनिज तेल उत्पादक देशांची संघटना ‘ओपेक’ने घटत्या खनिज तेलाच्या दरांवर उतारा म्हणून 1 लाख बॅरल्स खनिज तेलाचे उत्पादन घटवण्याचा निर्णय घेतला. ऑक्टोबर महिन्यात दर दिवशी उत्पादन घटवण्याच्या निर्णयाने खनिज तेलाच्या किमतीत काही प्रमाणात तरी वाढ होईल, ही अपेक्षा फोल ठरली. सुमारे 85 टक्के खनिज तेल बाहेरील देशातून आयात करणार्‍या भारतासारख्या देशासाठी ही दिलासादायक बाब आहे.

 

  • केंद्र सरकार कर्जाच्या भाराखाली दबलेल्या व्होडाफोन-आयडिया या दूरसंचार कंपनीमधील हिस्सा खरेदी करणार. व्होडाफोन-आयडियाने सरकारला 16 हजार कोटी रुपये व्याज देणे बाकी आहे. परंतु, ते कंपनीला देणे शक्य नसल्याने कंपनीने स्वतःचा 33 टक्के हिस्सा (इक्विटी) सरकारला देणे पसंत केले आहे. यामुळे प्रवर्तकांचा कंपनीतील हिस्सा 74.99 टक्क्यांवरून 50 टक्क्यांपर्यंत खाली येणार. कंपनीने समभागाचा भाव 10 रुपये असताना सरकारला हिस्सा विक्री करण्याचे ठरवले आहे. पंरतु, एप्रिल 19 पासून समभागाचा दर सातत्याने 10 रुपयापेक्षा कमी आहे. त्यामुळे समभाग दर जेव्हा 10 रुपयाच्या वरती जाऊन स्थिरावेल तेव्हा व्यवहार पूर्ण केला जाणार. 30 सप्टेंबर 2021 च्या आकडेवारीनुसार कंपनीवर एकूण 1,94,780 कोटी कर्ज आहे.

 

  •  ऑनलाईन व्यवहार सेवा पुरवणारी ‘मेयू’ ही कपंनी आपली प्रतिस्पर्धी कंपनी ‘बिलडेस्क’ला 4.7 अब्ज डॉलरला खरेदी करणार. यासाठी ‘कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडिया’कडून व्यवहारास मान्यता.

 

  •  8 सप्टेंबरच्या आकडेवारीनुसार, केंद्र सरकारच्या थेट कर संकलनात 30 टक्क्यांची भरघोस वाढ होऊन आतापर्यंतचे कर संकलन 5 लाख 29 हजार कोटींवर पोहोचले. आर्थिक वर्ष 2023 मध्ये एकूण 14 लाख 20 हजार कोटींचे थेट कर संकलन उद्दिष्ट आहे. एकूण उद्दिष्टापैकी 37.24 टक्के उद्दिष्ट आताच पूर्ण झाले आहे. सुमारे 1 लाख 19 हजार कोटींचा कर परतावादेखील केंद्र सरकारकडून करदात्यांना देण्यात आला आहे.

 

  •  एचडीएफसी लाईफ या एचडीएफसी लिमिटेडच्या उपकंपनीने आपल्या प्रवर्तक कंपनीसाठी (एचडीएफसी लिमिटेडसाठी) 35.7 दशलक्ष प्राधान्य समभाग (प्रेफ्रन्शिअल शेअर्स) जारी केले. याद्वारे एचडीएफसी लाईफने 2 हजार कोटींचा निधी उभा केला.

 

  • टाटा समूह लवकरच ‘आयफोन’च्या उत्पादन क्षेत्रात उतरण्याची शक्यता. तैवानची ‘विस्ट्रॉन’ आणि चीनची ‘फॉक्सकॉन’ सध्या भारतात ‘आयफोन’ तयार करते. यामुळे टाटा समूहाची तैवानच्या ‘विस्ट्रॉन’ कंपनीसोबत चर्चा. भागिदारीस मान्यता प्राप्त होण्यासाठी ‘अ‍ॅपल’ कंपनी आणि भारताची ‘मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड टेक्नॉलॉजी’ची सहमती मिळणे आवश्यक.

 

  • ऑनलाईन अ‍ॅपद्वारे कर्ज पुरवणार्‍या खासगी मोबाईल अ‍ॅपवर रिझर्व्ह बँकेची करडी नजर. केंद्र सरकारने रिझर्व्ह बँकेला अशा मान्यताप्राप्त मोबाईल अ‍ॅप्सची सूची बनवण्याचे निर्देश. या अ‍ॅप्ससाठी रिझर्व्ह बँकेची नियमावली लागू होणार. तसेच अशा कंपन्यांची रिझर्व्ह बँकेकडे कायदेशीर नोंदणी करावी लागणार. ग्राहकांची फसवणूक आणि पिळवणूक थांबवण्यासाठी रिझर्व्ह बँकेचे पाऊल.

 

  •  अनिल अंबानींची कंपनी ‘आर पॉवर’ आणि आंतरराष्ट्रीय गुंतवणूक उद्योगसमूह ‘वर्दे पार्टनर्स’ यांच्यामध्ये करार. या कराराद्वारे ‘आर पॉवर’ कंपनी 1200 कोटी रुपये उभी करणार. याचा वापर कंपनी कर्जे फेडण्यासाठी वापरणार.

 

  •  औषधनिर्मिती क्षेत्रातील प्रमुख कंपनी ‘बायोकॉन’ने ‘सिर्नोअन’ कंपनीतील 5.4 टक्के हिस्सा 1220 कोटींना विकला. 560.04 रुपये प्रतिसमभाग दरावर समभाग विक्री करण्यात आली.

 

  •  ‘इंडिगो एअरलाईन्स’चे सहसंस्थापक राकेश गंगावाल यांनी कंपनीतील 2.8 टक्के हिस्सा 250 दशलक्ष डॉलर्सना (2000 कोटी) विकला. पुढील पाच वर्षांत गंगावाल कंपनीतील संपूर्ण हिस्सा विकणार. 2 सप्टेंबर रोजी संपलेल्या सप्ताहाअखेर भारताची परकीय गंगाजळी 8 अब्ज डॉलर्सनी घडून 553.11 अब्ज डॉलर्सपर्यंत खाली आली. 9 ऑक्टोबर 2020 नंतरची ही सर्वात न्यूनतम पातळी आहे.

Back to top button