पुढारी ऑनलाईन डेस्क : ब्रिटनच्या नवनियुक्त पंतप्रधान लिझ ट्रस यांनी भारतीय वंशाच्या खासदार सुएला ब्रेव्हरमन (Suella Braverman) यांची गृहमंत्रीपदी नियुक्ती केली आहे. ४२ वर्षीय सुएला यांनी बोरिस जॉन्सन यांच्या सरकारमध्ये अॅटर्नी जनरल या पदावर काम केले आहे. त्या पंतप्रधान पदाच्या दावेदार होत्या. दरम्यान, त्यांनी पंतप्रधानपदाच्या निवडणुकीत ऋषी सुनक यांच्याऐवजी लिझ ट्रस यांना पाठिंबा दिला होता. त्यामुळेच सुएला यांना महत्त्वाच्या अशा गृहमंत्री पदावर नियुक्ती केल्याचे सांगितले जात आहे.
सुएला ब्रेव्हरमन (Suella Braverman) या कंझर्व्हेटिव्ह पक्षाच्या फेअरहाइमच्या खासदार आहेत. प्रिती पटेल आणि साजिद जाविद यांच्यानंतर त्या तिसऱ्या अल्पसंख्याक गृहमंत्री ठरल्या आहेत. सुएला यांना दोन मुले आहेत. त्यांची आई उमा तामिळ असून त्यांचे वडील ख्रिस्ती फर्नांडिस यांचा गोव्यात जन्म झालेला आहे. त्यांची आई मॉरिशसमधून ब्रिटनमध्ये आली. तर वडील केनियाहून १९६० मध्ये ब्रिटनमध्ये आले होते. ब्रेव्हरमन ह्या बौद्ध असून त्या नियमितपणे लंडन बौद्ध केंद्राला भेट देतात. 'धम्मपद' या बौद्ध ग्रंथावर हात ठेवून संसदेत त्यांनी पदाची शपथ घेतली होती. ब्रिटनच्या नव्या पंतप्रधान म्हणून लिझ ट्रस यांची निवड झाल्यानंतर प्रिती पटेल यांनी सोमवारी गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. आता त्यांच्या जागी सुएला यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
सुएला ब्रेव्हरमन यांनी शिक्षण निवडणूक समितीवर काम पाहिले आहे. परंतु, त्यांनी २०१८ मध्ये पदाचा राजीनामा दिल्यानंतर फेब्रुवारी २०२० मध्ये बोरिस जॉन्सन यांनी त्यांची अॅटर्नी जनरल पदावर नियुक्ती केली होती. निवडणुकीदरम्यान लिझ ट्रस यांना पाठिंबा देताना ब्रेव्हरमन म्हणाल्या की, लिझ आता पंतप्रधान होण्यासाठी तयार आहेत. त्यांना हे काम नव्याने शिकण्याची गरज नाही. ब्रिटनच्या गृहमंत्रीपदी नियुक्ती झाल्यानंतर सुएला यांनी ट्विट केले आहे. यामध्ये म्हटले आहे की, गृहमंत्री म्हणून नियुक्ती केल्याबद्दल मी लिझ ट्रस यांची अत्यंत आभारी आहे. यापुढे गृहमंत्री म्हणून देशाची सेवा करणार आहे.
हेही वाचलंत का ?