राजकारणाशिवाय माझ्याकडे काही कामधंदा नाही का? : दिगंबर कामत | पुढारी

राजकारणाशिवाय माझ्याकडे काही कामधंदा नाही का? : दिगंबर कामत

मडगाव : पुढारी वृत्तसेवा राजकारण करण्याशिवाय माझ्याकडे काही काम धंदा नाही का, लोक काहीही बोलतात आणि तुम्ही ते छापतात, अशा शब्दात मडगावचे आमदार दिगंबर कामत यांनी त्यांच्या कथित दिल्ली दौर्‍याबद्दल पत्रकारांना फटकारले.

कामत भाजपमध्ये प्रवेश करतील अशा वृत्तांना पुन्हा जोर आलेला आहे. त्यांच्या बोर्डिंगपासमध्ये ते दिल्लीत जाऊन आल्याचे स्पष्ट होत आहे. पण कामत यांनी त्या वृत्ताचा ठाम शब्दात नकार दिला आहे. येत्या 9 किंवा 11 रोजी दिगंबर कामत भाजपमध्ये प्रवेश करतील, असे वृत्त पुन्हा राज्यभर पसरले आहे.

दिल्लीत ते भाजपाच्या पक्षश्रेष्ठींना भेटून आले असल्याचे बोलले जात आहेत. सोमवारी रात्री ते गोव्यात परतले होते. त्यांना पत्रकारांनी विचारणा केली असता ते पत्रकारांवर घसरले. तुम्हाला ही माहिती कोण देतो माहिती नाही, पण आपण दिल्लीत गेलो नव्हतो, असे कामत म्हणाले. आपण दिवसभर केवळ राजकारण करत बसलो आहे का? आपल्याला आणखीनही कामधंदे आहेत, असे कामत यांनी पत्रकारांना सांगितले आहे. एक चित्रवाहिनीने कामत यांच्या विमानतळावरील बोर्डिंग पासवरून ते दिल्लीत गेले होते, असा दावा केला आहे. पण कामत यांनी मात्र ते वृत निराधार असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.

भाजपचे पालिकेवर सत्ता स्थापनेचे स्वप्न

कामत भाजपमध्ये प्रवेश करतील असे खात्रीपूर्वक वृत्त आहे. त्यामुळे पुन्हा या चर्चेला जोर आला आहे. मडगाव पालिकेचे भाजप समर्थक नगरसेवक कामत गटाच्या साहाय्याने पालिकेवर सत्ता स्थापन करण्याचे स्वप्न पाहत आहेत. कामत यांच्या हालचालीवर काँग्रेसची नजर
असल्याचे बोलले जाते

काँग्रेस सोडणार नाही : कार्लोस फेरेरा

पणजी ः आपण काँगे्रस पक्ष सोडणार नाही, मतदारांचा विश्वासघात करणार नाही. आपण भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार आहे, या सर्व अफवा आहेत. असा खुलासा हळदोण्याचे काँग्रेस आमदार अ‍ॅड. कार्लोस फेरेरा यांनी केला आहे. काँग्रेसचे आठ आमदार राजीनामा देऊन भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. त्यात अ‍ॅड. फरेरा यांच्या नावाची चर्चा असून त्यांनी राजीनामापत्रावर सही केल्याची चर्चा आहे.

या अनुषंगाने मंगळवारी (दि.6 रोजी) पत्रकारांनी अ‍ॅड. फेरेरा यांना विचारले असता त्यांनी वरील स्पष्टीकरण दिले. आपण कुठल्याही राजीनामापत्रावर सही केलेली नाही. जर आपली कुणी बनावट सही केलेली असेल तर त्याच्या विरोधात आपण कायदेशीर कारवाई करणार असल्याचा इशारा यावेळी अ‍ॅड. फरेरा यांनी दिला.

Back to top button