बँकेच्या लॉकरमधून गायब झाली आयुष्यभराची कमाई, वृद्धाला ३० लाखांची भरपाई देण्याचे सुप्रीम कोर्टाचे निर्देश | पुढारी

बँकेच्या लॉकरमधून गायब झाली आयुष्यभराची कमाई, वृद्धाला ३० लाखांची भरपाई देण्याचे सुप्रीम कोर्टाचे निर्देश

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : एका ८० वर्षाच्या वृद्ध व्यक्तीची आयुष्यभराची कमाई पैसे स्टेट बँक ऑफ इंडियाच्या लॉकरमधून चोरीला गेली होती. या प्रकरणी सुप्रीम कोर्टाने संबंधित व्यक्तीला ३० लाख रुपये भरपाई दोन महिन्याच्या आत देण्याचा आदेश बँकेला दिला. एका वृद्ध व्यक्तीने झारखंडमधील एसबीआय बोकारो स्टील सिटी शाखेतील लॉकरमध्ये रोख रक्कम आणि मौल्यवान वस्तू ठेवल्या होत्या. पण बँकेत झालेल्या चोरीत त्यांच्या लॉकरमधील पैसे आणि वस्तू गायब झाल्या. या प्रकरणी बँकेने जबाबदारी झटकली. त्यानंतर सदर व्यक्तीने बँकेविरुद्ध राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडे (National Consumer Disputes Redressal Commission) दावा दाखल केला. त्यावर राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोगाने त्यांना ३० लाख रुपये भरपाई देण्याचा आदेश दिला होता. त्याला बँकेने सुप्रीम कोर्टात आव्हान दिले होते. पण सुप्रीम कोर्टाने बँकेचे अपील फेटाळून लावले.

न्यायमूर्ती सूर्यकांत आणि एएस ओका यांच्या खंडपीठाने सांगितले की, “त्यांनी तुमच्यावर विश्वास ठेवल्यामुळे त्यांची संपूर्ण आयुष्याची कमाई गमावली आहे. आम्ही हे वैयक्तिक नुकसान ठरवू शकत नाही. पण यामुळे वृद्ध व्यक्तीला खूप त्रास सहन करावा लागला आहे .”

एसबीआय शाखेत चोरीची घटना २५ डिसेंबर २०१७ रोजीच्या रात्री घडली होती. या चोरीदरम्यान बँकेचे ग्राहक असलेले गोपाळ प्रसाद महंती यांचे पैसे आणि मौल्यवान वस्तू लॉकरमधून लंपास झाल्या होत्या. महंती यांनी याबाबत तक्रार केली होती. या चोरी प्रकरणी पोलिसांनी १६ जणांना अटक केली आणि काही दागिने जप्त केले. कारण चोरट्यांनी उर्वरित दागिने सोन्याच्या बिस्किटे किंवा ब्लॉक्समध्ये वितळवले होते. यावर एनसीडीआरसीने बँकेने केलेला आक्षेप नाकारत “ग्राहक ज्या उद्देशाने लॉकर भाड्याने घेण्याच्या सुविधेचा लाभ घेतात. यामुळे त्यांच्या मालमत्तेची योग्य काळजी घेतली जात असल्याची खात्री त्यांना मिळावी. पण या प्रकरणात बँकेच्या टी लॉकरमधील तक्रारदारांच्या मालमत्तेची/मौल्यवान वस्तूंची काळजी घेण्यात बँक अपयशी ठरली.”

बँकेच्या बाजू मांडणाऱ्या वकिलांनी दावा केला की “लॉकरमध्ये कोणत्या गोष्टी पडल्या आहेत हे बँकेला माहीत नसल्याने राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या भरपाई आदेशामुळे आमच्यासाठी मोठी अडचण निर्माण झाली आहे.” महंती यांच्यासह बँकेचे आणखी एक ग्राहक शशी भूषण कुमार यांनी दावा केला की त्यांनी ३२ लाखांचे सोने, चांदीचे दागिने, रोख रक्कम तसेच महागडी घड्याळे, बँक आणि टपाल कागदपत्रे मिळून १.८५ लाख किमतीच्या वस्तू चोरीला गेल्या आहेत.

सुप्रीम र्कोटात वैयक्तिकरित्या हजर राहून महंती म्हणाले, “मी माझ्या आयुष्याची सर्व कमाई गमावली आहे.” बँकेच्या वतीने कोर्टात बाजू मांडणारे वकील संजय कपूर यांनी न्यायालयाला सांगितले की राज्य ग्राहक आयोग आणि एनसीडीआरसीने महंती यांना ३० लाख भरपाई देण्याचा आदेश दिला असला तरी लॉकरमधील वस्तूंबाबत ते पुरावा देऊ शकलेले नाहीत.

बँकेने दावा केला की ते नुकसानीसाठी जबाबदार नाहीत. कारण त्यांनी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने जारी केलेल्या निर्देशांचे पालन केले आहे. ज्यात फायर डिटेक्शन आणि अलार्म सिस्टम, सुरक्षा अलार्म सिस्टम आणि सीसीटीव्ही सिस्टमची तरतूद आहे. ज्यावेळी बँकेत चोरी झाली त्यावेळी बँकेतील सर्व यंत्रणा कार्यान्वित होत्या. परंतु चोरट्यांनी फायर अलार्म, सुरक्षा अलार्म आणि सीसीटीव्ही यंत्रणा निष्क्रीय केली. पण त्यांच्या हालचाली डिजीटल व्हिडिओ रिकॉर्डरमध्ये (DVR) टिपल्या गेल्या. यामुळे पोलिसांना चोरट्यांना पकडण्यात यश आले. या सर्व बाबी लक्षात घेऊन कोर्टाने राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोगाचा निर्णय कायम ठेवत महंती यांना ३० लाख रुपये देण्याचा आदेश दिला.

 हे ही वाचा :

Back to top button