ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांचा राजीनामा | पुढारी

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांचा राजीनामा

लंडन; ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी राजीनामा देण्यास सहमती दर्शविली असल्याचे वृत्त आहे. बोरिस जॉन्सन आज गुरुवारी ब्रिटनच्या पंतप्रधानपदाचा राजीनामा देत असल्याचे जाहीर करतील, असे वृत्त बीबीसीने दिले आहे. नवनियुक्त मंत्री आणि इतर ५० हून अधिक जण बंडखोरी करून जॉन्सन सरकारमधून बाहेर पडले आहेत. यामुळे जॉन्सन एकाकी पडले आहेत.

गेल्या दोन तासांत ब्रिटनमधील आठ मंत्र्यांनी राजीनामा दिले आहेत. यामुळे एकाकी पडलेले जॉन्सन पंतप्रधानपदावरुन पायउतार होत असल्याचे मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटले आहे. बोरिस जॉन्सन आज काँझर्व्हेटिव्ह पक्षाचे नेते म्हणून राजीनामा देतील,” असे बीबीसीने वृत्तात नमूद केले आहे.

जॉन्सन यांच्या जागी काँझर्व्हेटिव्ह पक्ष नवीन नेत्याची निवड करत असताना जॉन्सन पदावर राहतील की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. काँझर्व्हेटिव्ह पक्षात बंडखोरी झाली आहे. आतापर्यंत ४१ मंत्र्यांनी राजीनामे दिले आहेत. त्यामुळे जॉन्सन यांच्यावर राजीनामा देण्यासाठी दबाव वाढला होता. विरोधी लेबर पक्षानेदेखील त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

अर्थमंत्री ऋषी सूनक यांच्या राजीनाम्यानंतर बोरिस जॉन्सन यांची खुर्ची अडचणीत आली होती. त्यांनी ५ जुलै रोजी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर आरोग्यमंत्री साजिद जाविद यांनीदेखील राजीनामा दिला होता.

यावर्षी फेब्रुवारीमध्ये जॉन्सन यांनी ख्रिस पिंचर (Chris Pincher) यांनी पक्षाच्या डेप्युटी चीफ व्हीप म्हणून नियुक्ती केली होती. पिंचर यांच्या नियुक्तीमुळे जॉन्सन यांच्या विरोधात बंडखोरी सुरु झाली. ३० जून रोजीच्या ‘द सन’च्या वृत्तानुसार, ख्रिस पिंचर यांनी लंडनमधील एका क्लबमध्ये दोन युवकांना आक्षेपार्ह पद्धतीने स्पर्श केला होता. पिंचर यांच्यावर याआधीही लैंगिक शोषणाचा आरोप झाला आहे. ‘द सन’च्या वृत्तानतंर क्रिस पिंचर यांनी डेप्युटी चीफ व्हीप पदाचा राजीनामा दिला होता.

Back to top button