बोरिस जॉन्सन यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव | पुढारी

बोरिस जॉन्सन यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव

लंडन ; वृत्तसंस्था : पार्टी गेट प्रकरणामुळे अडचणीत आलेले इंग्लंडचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना आता अविश्वास प्रस्तावाचा सामना करावा लागणार आहे. स्वपक्षीय कॉन्झर्व्हेटिव्ह पार्टी (हुजूर पक्ष) चे 359 खासदार मतदानातून जॉन्सन यांचे भवितव्य ठरवणार आहेत. जर प्रस्तावात जॉन्सन पराभूत झाले तर त्यांना पंतप्रधानपद सोडावे लागेल. जर जॉन्सन जिंकले तर त्यांना आणखी एक वर्ष पंतप्रधानपदावर राहण्यासाठी रस्ता मोकळा होणार आहे.

कोरोना काळात ब्रिटनमध्ये सर्वत्र लॉकडाऊन आणि कडक निर्बंध असताना जॉन्सन यांनी पार्टी केली होती. या संपूर्ण प्रकरणाला ब्रिटनमध्ये पार्टी गेट स्कँडल असे नाव दिले गेले होते. या प्रकरणाचा चौकशी अहवाल समोर आल्यानंतर हुजूर पक्षाच्या 40 हून अधिक खासदारांनी जॉन्सन यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती.

पंतप्रधान निवासस्थानी जॉन्सन यांनी ही पार्टी होऊ दिली आणि ते स्वतःही त्यात सहभागी झाले, असा त्यांच्यावर आरोप आहे. ब्रिटनमधील एका सर्व्हेनुसार 64 टक्के नागरिकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. पार्टी गेट स्कँडलप्रकरणी पोलिसांनी 83 लोकांवर गुन्हे दाखल केले असून 126 लोकांना दंड ठोठावला होता.

हे होऊ शकतात पुढील पंतप्रधान

बोरिस जॉन्सन यांचे पद गेल्यास पंतप्रधानपदाच्या शर्यतीत एलिझाबेथ ट्रस यांचे नाव सर्वात आघाडीवर आहे. ट्रस सध्या परराष्ट्र सचिव आहेत. पक्षात त्या प्रसिद्ध आहेत. याशिवाय जेरेमी हंट, ऋषी सुनाक, नदीम जाहवी, पेनी मॉडर्न यांच्याही नावांची चर्चा आहे.

Back to top button