अफगाणिस्तान : कोण आहे क्रूरकर्मा हिब्तुल्लाह अखुंदजादा…? | पुढारी

अफगाणिस्तान : कोण आहे क्रूरकर्मा हिब्तुल्लाह अखुंदजादा...?

काबूल; वृत्तसंस्था : तालिबानी दहशतवाद्यांनी राजधानी काबूलसह संपूर्ण अफगाणिस्तानवर आपला कब्जा प्रस्थापित केला आहे. राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी आणि उपराष्ट्राध्यक्ष अमीरुल्लाह सालेह हे देश सोडून परागंदा झाले आहेत. राष्ट्रपती भवन तालिबानींनी ताब्यात घेतले आहे. हिब्तुल्लाह अखुंदजादा याला अमीर-अल-मोमिनीन म्हणजे अफगाणिस्तानचा राष्ट्राध्यक्ष म्हणून घोषित करण्यात आले आहे.

अरबी भाषेत हिब्तुल्लाहचा अर्थ होतो ईश्वराची भेट! मात्र नावाच्या पूर्ण उलट वर्तन असणारा हिब्तुल्लाह अखुंदजादा हा क्रूर कमांडर आहे. हिब्तुल्लाह याने अनैतिक संबंध ठेवणार्‍यांची हत्या आणि चोरी करणार्‍यांचे हात तोडले आहेत.

वडील मशिदीत इमाम

हिब्तुल्लाह अखुंदजादा याचा जन्म 1961 च्या दरम्यान कंधार प्रांतातील पंजवई जिल्ह्यात झाला. तो नूरझाई कबिल्याशी संबंधित आहे.हिब्तुल्लाहचे वडील मुल्ला महम्मद धार्मिक गुरू होते. तो गावातील मशिदीत इमाम होता. त्याच्याजवळ ना जमीन होती, ना संपत्ती. मशिदीत मिळणारे दान, पैसा आणि अन्नातून तो आपले घर चालवत होता. हिब्तुल्लाह आपल्या वडिलाच्या तालमीतच तयार झाला.

सोव्हिएत युनियनच्या आक्रमणाने उचलली शस्त्रे

1980 च्या सुरुवातीलाच अफगाणिस्तानमध्ये सोव्हिएत युनियनचे लष्कर दाखल झाले होते. त्यांच्या संरक्षणाखाली अफगाणिस्तानचे सरकार कार्यरत होते. त्यावेळी अनेक दहशतवादी संघटना सरकारच्या विरोधात लढत होत्या. या संघटनांना अमेरिका आणि पाकिस्तानकडून लष्करी मदत मिळत होती.

त्यावेळी हिब्तुल्लाहचे कुुटुंब पाकिस्तानमधील क्वेटामध्ये गेले आणि त्यानंतर हिब्तुल्लाहने सरकारविरोधात शस्त्रे उचलली. 1989 मध्ये सोव्हिएत युनियनने आपले सैन्य अफगाणिस्तानातून माघारी बोलावले. त्यानंतर दहशतवादी संघटना आपापसात लढू लागल्या. त्यातील मुल्ला महम्मद उमर या तरुणाने काही कट्टरपंथीय तरुणांना एकत्र करत तालिबानचे बंड सुरू केले. त्यामध्ये हिब्तुल्लाह अखुंदजादा याचाही समावेश होता.

1996 मध्ये तालिबानींनी काबूल शहरावर कब्जा घेतला, त्यावेळी हिब्तुल्लाह याच्याकडे फराह प्रांतातील धार्मिक विभागाची जबाबदारी देण्यात आली. त्यानंतर तो कंदहारला गेला आणि एका मदरशात मौलवी झाला. हा मदरसा तालिबानचा संस्थापक मुल्ला उमर चालवत होता. या मदरशात 1 लाखापेक्षा अधिक तालिबानी दहशतवादी शिकत होते.

1996 मध्ये अफगाणिस्तानात तालिबानी वर्चस्व निर्माण झाल्यानंतर हिब्तुल्लाह याला अफगाणिस्तानच्या शरिया अदालतचा मुख्य न्यायाधीश करण्यात आले. त्यावेळी हिब्तुल्लाह याने आपल्या कार्यकाळात क्रूर शिक्षा देण्याचे फतवे काढले. शस्त्रांची तस्करी आणि अनैतिक संबंध राखणार्‍यांची हत्या आणि चोरी करणार्‍यांचे हात तोडण्याचे त्याने फतवे काढले. फतवे काढण्यात हिब्तुल्लाहचा नावलौकिक होता. फतवे काढण्यासाठी मुल्ला उमर आणि मुल्ला मन्सूर तालिबानी म्होरक्या हिब्तुल्लाह याच्याशीच सल्लामसलत करत असत.

अमेरिकन हल्ल्यानंतर अफगाणिस्तानातच तळ

7 ऑक्टोबर 2001 मध्ये अमेरिकेने अफगाणिस्तानवर हल्ला केला. त्यावेळी तालिबानी म्होरके सैरभैर झाले. काही मारले गेले, काहींना पकडण्यात आले, तर अन्य काही पाकिस्तानात पळून गेले. त्यावेळी हिब्तुल्लाह अफगाणिस्तानातच तळ ठोकून राहिला.

2012 मध्ये हिब्तुल्लाहच्या हत्येचा प्रयत्न

हिब्तुल्लाह अखुंदजादाच्या एका चेल्याने सांगितले की, 2012 मध्ये हिब्तुल्लाहच्या हत्येचा प्रयत्न झाला होता. त्यावेळी हिब्तुल्लाह क्वेटा येथील एका मदरशात शिक्षण घेत होता. त्यावेळी एका विद्यार्थ्याने त्याच्यावर पिस्तूल रोखले होते; पण हिब्तुल्लाहचे नशीब बलवत्तर, त्याला त्यावेळी गोळी लागली नाही.

मुल्ला मन्सूरच्या मृत्यूनंतर हिब्तुल्लाह बनला चीफ कमांडर

तालिबानचा संस्थापक मुल्ला महम्मद उमरचा 2013 मध्ये मृत्यू झाला. त्यानंतर हकीमुल्लाह मसूदकडे तालिबानची सूत्रे गेली. 2013 मध्ये एका ड्रोन हल्ल्यात तो ठार झाला. 2015 मध्ये तालिबानने मुल्ला मन्सूर याला आपला नवा नेता म्हणून घोषित केले. मे 2016 मध्ये एका ड्रोन हल्ल्यात त्याचाही खात्मा झाला. 20 मे 2016 मध्ये हिब्तुल्लाह अखुंदजादा याच्याकडे तालिबानची सूत्रे सोपवण्यात आली. मुल्ला मन्सूरने आपल्या मृत्युपत्रात हिब्तुल्लाह अखुंदजादा याला आपला वारस म्हणून घोषित केले होते. काहींचा हिब्तुल्लाहला विरोध होता; मात्र त्याला विरोध करण्याची कोणातही धमक नव्हती.

तालिबानचा प्रवक्ता युसूफ अहमदी याने सांगितले होते की, 20 जुलै 2017 मध्ये हिब्तुल्लाह अखुंदजादा याचा मुलगा अब्दुल रेहमान अफगाणिस्तानच्या लष्करी तळावर केलेल्या आत्मघातकी हल्ल्यात मारला गेला. तर ऑगस्ट 2019 मध्ये हिब्तुल्लाहचा भाऊ हाफिज अहमदुल्लाह एका बॉम्बस्फोटात मारला गेला. त्याच्या कुटुंबातील अनेक जण बॉम्बस्फोटात ठार झाले आहेत.

Back to top button