Washington DC : अमेरिकेत म्युझिक कॉन्सर्टमध्ये गोळीबार, एका मुलाचा मृत्यू, एका पोलिसासह २ नागरिक जखमी | पुढारी

Washington DC : अमेरिकेत म्युझिक कॉन्सर्टमध्ये गोळीबार, एका मुलाचा मृत्यू, एका पोलिसासह २ नागरिक जखमी

वॉशिंग्टन : पुढारी ऑनलाईन : अमेरिकेतील वॉशिंग्टन डीसीमध्ये (Washington DC) पुन्हा गोळीबार झाला आहे. रविवारी रात्री झालेल्या या घटनेत एका पोलीस अधिकाऱ्यासह अनेकांना गोळ्या लागल्या. ही घटना जुनटींथ म्युझिक कॉन्सर्ट दरम्यान घडल्याचे समोर आले आहे. हल्लेखोराने संगीत मैफलीच्या ठिकाणी लोकांवर गोळीबार केला. या हल्ल्यात एका अल्पवयीन मुलाचा जागेवरच मृत्यू झाला. त्याचबरोबर, एका पोलिसासह २ नागरिक जखमी झाले. (Washington DC)

वॉशिंग्टन पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संगीत मैफलीच्या ठिकाणी शोधमोहीम सुरू आहे. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेत एका तरुणाचा गोळ्या झाडून मृत्यू झाल्याचे वॉशिंग्टन पोलिसांनी पत्रकार परिषदेदरम्यान सांगितले. एका पोलीस अधिकाऱ्याशिवाय अन्य दोन जण जखमी झाले. ज्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

अमेरिकेतील गोळीबार थांबण्याचे नाव घेत नाहीये. वॉशिंग्टन डीसीमध्ये गोळीबार होण्यापूर्वी या आठवड्यात अनेक ठिकाणी गोळीबाराच्या घटना घडल्या आहेत. यामध्ये जवळपास आठ जणांचा मृत्यू झाला आहे. अलीकडेच शिकागो येथे झालेल्या गोळीबारात पाच जणांचा मृत्यू झाला होता. रविवारी लॉस एंजेलिसमध्ये एका पार्टीदरम्यान झालेल्या गोळीबारात तीन जण ठार तर चार जण जखमी झाले होते. याआधीही अनेक मोठ्या घटना समोर आल्या आहेत. गेल्याच महिन्यात शाळेत झालेल्या गोळीबारात १९ मुलांसह २१ जणांचा मृत्यू झाला होता.

Back to top button