

पुणे : पुढारी वृत्तसेवा: संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज व जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे आगमन बुधवारी (दि. 22) शहरात होणार आहे. महापालिका, पोलिस प्रशासनाचे नियोजन झाले असतानादेखील बाजार समिती प्रशासनाकडून अद्याप तयारी करण्यात आलेली नाही. औषध फवारणी, ई-टॉयलेट, वाहतूक आदी व्यवस्थेचे नियोजन केले नसल्याने वारकर्यांची गैरसोय होण्याची चिन्हे आहेत.
दोन दिवसांवर पालखी आगमन असतानादेखील बाजार समितीने नियोजनासाठी महापालिका, पोलिस प्रशासनाची बैठक घेतलेली नसल्याचे समोर आले आहे. बाजार समिती महापालिका, पोलिस प्रशासन, आडते असोसिएशन व दि पूना मर्चंट्स चेंबरच्या पदाधिकार्यांची बैठक घेत नियोजन करत असते.
संघटनांकडून नियोजन करण्याची मागणी होत असतानादेखील अद्यापी नियोजन आढावा बैठक घेण्यात आलेली नाही, तर कोरोनाच्या दोन वर्षांनंतर पालखी सोहळा होत असल्याने यंदा वारकर्यांची संख्या जास्त असण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्व सुविधांचा आढावा घेणे गरजेचे असताना समितीने अद्यापी याकडे लक्ष दिले नसल्याचे समोर येत आहे.
बाजार आवारात वास्तव्यास येणार्या वारकर्यांची गैरसोय होऊ नये म्हणून बाजार समितीचे अधिकारी, कर्मचारी यांना बाजार आवारात स्वच्छता, सुरक्षा व्यवस्था, सीसीटीव्ही, जंतुनाशक औषध व पावडर फवारणी, लख्ख प्रकाश व्यवस्था, शौचालयाची व्यवस्था, पाणीपुरवठाबाबत दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या आहेत तसेच महानगरपालिकेच्या अधिकार्यांशी बाजार आवारात फिरते शौचालय व पाण्याचे टँकर पुरवण्याबाबत चर्चा करण्यात आली आहे. वारकर्यांच्या आगमनापूर्वी पुन्हा संयुक्त बैठक घेऊन आढावा घेण्यात येईल.
– मधुकांत गरड, प्रशासक व सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती, पुणे
हेही वाचा