काठमांडू ; वृत्तसंस्था : नेपाळच्या (Nepal Plane Crash) तारा एअरचे 9 एनएईटी या प्रकारातील डबल इंजिन विमान खराब हवामानामुळे नेपाळमधील लाम्छी नदीकाठी असलेल्या कोगांग नावाच्या गावाजवळ कोसळले आहे. विमानात चौघा भारतीयांसह 22 जण होते आणि त्यापैकी कोणीही वाचले नसावे, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. विमानातील चारही भारतीय मुंबईचे आहेत.
रविवारी उड्डाणानंतर पंधरा मिनिटांतच या विमानाचा हवाई नियंत्रण कक्षाशी असलेला संपर्क तुटला आणि काही काळातच ते दुर्घटनाग्रस्त झाले. विमानचालकाकडील मोबाईल फोनमुळे हे विमान नेमके कुठे कोसळले याचा पत्ता लागला. हे विमान पोखराहून जोमसोमकडे निघाले होते. तारा एअरचे विमान सर्वात शेवटी मस्तंग जिल्ह्यात दिसले होते, अशी माहिती जिल्हाधिकारी नेत्रप्रसाद शर्मा यांनी दिली.
विमानात 13 नेपाळी, 2 जर्मन, 4 भारतीय नागरिक आणि 3 कर्मचारी होते. अशोक कुमार त्रिपाठी, धनुष त्रिपाठी, रितिका त्रिपाठी आणि वैभवी त्रिपाठी अशी या विमानातील चौघा भारतीय प्रवाशांची नावे असून, चौघेही एकाच कुटुंबातील आहेत.
पोलिस अधिकारी रमेश थापा यांनी सांगितले की, गेल्या काही दिवसांपासून येथे पाऊस पडत असला तरी सर्व उड्डाणे सुरळीत सुरू होती. दरीत उतरण्यापूर्वी विमाने डोंगरातून उडतात. पर्वतीय पायवाटेवर ट्रेकिंग करणार्या परदेशी गिर्यारोहकांमध्ये हा परिसर प्रसिद्ध आहे. या मार्गावरून भारतीय आणि नेपाळी यात्रेकरू मुक्तिनाथ मंदिरालाही भेट देतात.
2016 मध्येही याच मार्गावर अपघात (Nepal Plane Crash)
2016 मध्ये तारा एअरचे विमान नेपाळमधील पोखराहून जोमसोमला जात होते, तेव्हाही त्याचा संपर्क तुटला होता. उड्डाणानंतर काही वेळातच ते कोसळून विमानातील सर्व 23 जणांचा मृत्यू झाला होता.
खास परवाना आवश्यक
उरात धडकी भरवणार्या पर्वतांचे तीव्र सुळके असलेला नेपाळमधील हा मार्ग अत्यंत आव्हानात्मक म्हणून गणला जातो. त्यामुळे या मार्गावर विमाने चालवण्यासाठी चालकाला खास प्रशिक्षण घ्यावे लागते. त्यानंतरच या प्रशिक्षित चालकाला विशेष परवाना बहाल केला जातो.
घटनाक्रम
* पोखराहून जोमसोमसाठी रविवारी सकाळी 9.55 वाजता उड्डाण
* 10.20 वा. हे विमान जोमसोमला उतरणार होते
* 11 वाजून गेले तरी विमानाशी संपर्क नाही
* त्यानंतर विमान कोसळल्याचे वृत्त धडकले