पुढारी ऑनलाईन डेस्क :
रशिया आणि युक्रेनमधील युद्ध गेली ४४ दिवस झाले सुरुच आहे. युक्रेनमधील अनेक शहरे उद्ध्वस्त झाली आहेत. हे वास्तव जगासमोर मांडणारे फोटो आणि व्हिडीओमुळे जगातील प्रत्येक संवेदनशील व्यक्तीला हेलावून सोडलं आहे. काही महिन्यांपूर्वी युक्रेनमधील जगातील सुंदर शहरे आज बेचिराख झाली आहेत. हजारो सर्वसामान्य नागरिकांचा बळी या युद्धाने घेतला आहे. आता अशाच युद्धबळी ठरलेल्या आईला तिच्या चिमुकलीने लिहिलेले पत्र ( Ukrainian girl letter ) सोशाल मीडियावर व्हायरल झालं आहे. हे हृदयद्रावक पत्र युद्धाच्या झळ्यांमध्ये चिमुकले कसे होपरळतात याची प्रचिती देते.
९ वर्षांच्या मुलीने आपल्या बोरोडियांका शहरात रशियाच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या आपल्या आईला पत्र लिहिले आहे. युक्रेनचे परराष्ट्र मंत्रालयाचे सल्लागार एंटोन गेरश्चिेंको यांनी ते ट्विटरवर शेअर केले आहे.
चिमुकलीने आपल्या पत्रात नमूद केले आहे की, आई, मी तुला ८ मार्च रोजी हे पत्र लिहित आहे. माझ्या आयुष्यातील सुंदर अशी ९ वर्ष दिल्याबद्दल तुझे मन:पूर्वक आभार. तु मला एक सुंदर बालपण दिलंस. तु जगातील एक चांगली आई आहेस. मी तुला कधीच विसरणार नाही. तु स्वर्गात जावस . तु स्वर्गात सुखी राहावस, अशी माझी इच्छा आहे. मी तुला स्वर्गात भेटायला येईन. स्वर्गात मला येता यावे, यासाठी मी एक चांगली मुलगी होण्याचा प्रयत्न करेन, असेही तिने पत्रात म्हटलं आहे.
रशियाने २४ फेब्रुवारीला युक्रेनवर हल्ला केला. गेली ४४ दिवस युद्ध सुरुच आहे. यामध्ये युक्रेनच्या शेकडो सैनिकांसह हजारो नागरिकही ठार झाले आहेत. सुमारे ४० लाखांहून अधिक नागरिकांनी शेजारच्या राष्ट्रांमध्ये स्थलांतर केले आहे. दुसर्या महायुद्धानंतरचे स्थलांतर होण्याचा हा सर्वात मोठा आकडा आहे. बुचामध्ये झालेल्या नरसंहारापेक्षाही बोरोडियांका शहरातील परिस्थिती भयावह असल्याचे युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेंस्की यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा :