पुढारी ऑनलाईन डेस्क : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या विरोधातील अविश्वास ठराव फेटाळण्याचा सभापतींचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने घटनाबाह्य ठरवला होता. आणि पुन्हा अविश्वास ठरावावर मतदान घेण्यास मान्यता दिली होती. त्यानंतर पाकिस्तानी संसदेत शनिवारी झालेल्या अविश्वास ठरावात इम्रान खान यांचे सरकार कोसळले. (Shahbaz Sharif) प्रस्तावाच्या बाजूने १७४ मते पडली. तर विरोधात एकही मते पडली नाहीत. त्यामुळे इम्रान खान यांना पायउतार व्हावे लागले.
आता इम्रान खाननंतर पुढील पंतप्रधान कोण याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. इम्रान खान सरकार कोसळल्यानंतर पीएमएल (नवाज) नेते शाहबाज शरीफ (Shahbaz Sharif) पंतप्रधान होऊ शकतात, अशी चर्चा सुरू झाली आहे. शाहबाज शरीफ हे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांचे भाऊ आहेत.
पाकिस्तानचे तीन टर्म पंतप्रधान राहिलेले नवाझ शरीफ यांचे बंधू शाहबाज शरीफ (Shahbaz Sharif) आहेत. इम्रान खान यांच्या विरोधातील प्रचाराचा प्रमुख चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे. शाहबाज शरीफ यांनी पंजाब प्रांताचे मुख्यमंत्रीपद सांभाळले आहे. आणि ते अबी पाकिस्तान मुस्लिम लीगचे (नवाज) अध्यक्ष आहेत. शाहबाज यांना सर्वाधिक काळ पंजाबचे मुख्यमंत्री राहण्याचा मान मिळाला आहे. त्यांनी तीनवेळा मुख्यमंत्री पद भूषवले आहे. १९९७ मध्ये ते पहिल्यांदा पंजाब प्रांताचे मुख्यमंत्री झाले. १९९९ मध्ये परवेज मुशर्रफ यांच्या सत्तापालटानंतर ते पाकिस्तानातून बाहेर गेले. त्यानंतर ते सौदी अरेबियात ८ वर्षे अज्ञातवासात होते.
शाहबाज २००७ मध्ये पाकिस्तानात परत आले आणि २००८ मधील निवडणुकीत त्यांच्या पक्षाला विजय मिळाला. त्यानंतर ते पुन्हा पंजाबचे मुख्यमंत्री झाले. त्यानंतर त्यांनी २०१३ मध्ये तिसऱ्यांदा पंजाबचे मुख्यमंत्री म्हणून पदभार घेतला. २०१८ मध्ये पीएमएल-एनच्या पराभवापर्यंत त्यांनी पूर्ण कार्यकाळ सांभाळला. २०१८ च्या निवडणुकीनंतर त्यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यात आली.
शाहबाज यांच्याकडे कठोर प्रशासक म्हणून पाहिले जाते. त्यांचे सैन्याशी असलेले संबंध त्यांच्या भावाच्या तुलनेत बऱ्याच प्रमाणात चांगले होते. दरम्यान, लष्कराने शरीफ यांना पदच्युत केले. शाहबाज शरीफ यांनी लंडन, दुबई येथे अनेक विवाह आणि मालमत्ता मिळवल्या असूनही ते सामान्य लोकांमध्ये लोकप्रिय आहेत.
दरम्यान, मनी लाँड्रिंगचा आरोप करत डिसेंबर २०१९ मध्ये नॅशनल अकाउंटेबिलिटी ब्युरोने शाहबाज आणि त्यांचा मुलगा हमजा यांच्या २३ मालमत्ता गोठवून टाकल्या. त्यानंतर या प्रकरणात त्यांना अटक करण्यात आली होती. लाहोर हायकोर्टाने एप्रिल २०२१ मध्ये त्यांना जामीन मंजूर केला होता.
हेही वाचलंत का ?