पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान यांना तुर्तास ‘जीवदान’ ! सभापतींनी अविश्वास ठराव फेटाळला | पुढारी

पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान यांना तुर्तास 'जीवदान' ! सभापतींनी अविश्वास ठराव फेटाळला

पुढारी ऑनलाईन डेस्क : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्याविरुद्धातील अविश्वास ठरावावर आज (रविवार) मतदान होणार  होते; परंतु पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्याविराेधातील अविश्वास ठराव हा घटनाबाह्य असल्‍याचे स्‍पष्‍ट करत पाकिस्‍तान संसदेच्‍या सभापतींनी ताे फेटाळला असून, संसद २५ एप्रिलपर्यंत तहकूब करण्यात आली आहे.

मुत्ताहिदा कौमी मूव्हमेंट पाकिस्तान या पक्षाने इम्रान खान यांचा पाठिंबा काढून घेतला आहे. त्यामुळे त्यांनी नॅशनल असेंब्लीत बहुमत गमावले आहे. या पार्श्वभूमीवर इम्रान खान यांच्या विरुद्ध अविश्वास ठराव आणण्यात आला हाेता. विरोधकांनी संसदेचे अध्यक्ष असद कैसर यांच्याविरोधात आणखी १०० विरोधी खासदारांच्या सह्यांसह अविश्वास प्रस्तावाची नोटीस दिली हाेती.

दरम्यान, मतदानाच्या आधी संसद परिसरातील रेडझोन भाग बंद करण्यात आले आहेत. येथे हजारो सैनिकांना तैनात करण्यात आले आहे. संसदेभोवती सुमारे तीन हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात केला आहे. तर खबरदारीचा उपाय म्हणून इस्लामाबाद येथे कलम १४४ लागू करण्यात आले असून, सर्व सुरक्षा यंत्रणांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. दोन्ही बाजूंचे समर्थक अविश्वास प्रस्तावावरील मतदानापूर्वी किंवा नंतर हिंसाचार पसरवू शकतात, अशी भीती गुप्तचर यंत्रणांनी व्यक्त केली आहे.

पाकिस्तानात राजकीय कलह सुरू झाल्याच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांनी या आठवड्यात पंतप्रधान इम्रान खान यांची भेट घेतली होती.दरम्यान, पाकिस्तानच्या ७३ वर्षांच्या प्रदीर्घ इतिहासात अर्ध्याहून अधिक काळ शक्तिशाली लष्कराची राजवट राहिली आहे. पाकिस्तानमधील सुरक्षा आणि परराष्ट्र धोरणाशी संबंधित अनेक गोष्टींमध्ये आतापर्यंत लष्कराने हस्तक्षेप केला आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button