Russia Ukrain War : युक्रेन युद्धामुळे पुतीन यांच्या लोकप्रियतेत वाढ; बनले अधिक शक्तीशाली नेते | पुढारी

Russia Ukrain War : युक्रेन युद्धामुळे पुतीन यांच्या लोकप्रियतेत वाढ; बनले अधिक शक्तीशाली नेते

मॉस्को; पुढारी ऑनलाईन डेस्क : युक्रेन युद्धामुळे (Russia Ukrain War) रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची लोकप्रियता पुन्हा एकदा शिगेला पोहोचली आहे. रशियामध्ये युक्रेन युद्धावर तुरळक विरोध होत असताना, सरकारी एजन्सीने घेतलेल्या ताज्या सर्वेक्षणात, 65 टक्के रशियन जनतेने युक्रेनमध्ये पुतीनच्या “विशेष लष्करी ऑपरेशन” ला मान्यता दिली आहे. एवढेच नाही तर दुसऱ्या एका स्थानिक सर्वेक्षणात 71 टक्के लोकांनी पुतिन यांच्यावर विश्वास व्यक्त केला आहे. युक्रेन युद्ध सुरू होण्यापूर्वी, पुतीनवर रशियन जनतेचा विश्वास फक्त 60 टक्के होता.

सेंट पीटर्सबर्ग येथील टॅक्सी चालक ली यांनी एशिया टाईम्सला सांगितले की, ‘पुतिन जे काही करत आहेत ते योग्य आहे. युक्रेनने (Russia Ukrain War) आम्हाला पर्याय सोडला नाही. आम्हाला डॉनबास भागात रशियन लोकांची कत्तल थांबवायची होती. एकीकडे पाश्चात्य देश रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्याचा निषेध करत आहेत, तर रशियाच्या राष्ट्राध्यक्षांना या लष्करी कारवाईला त्यांच्या देशातील मोठ्या लोकसंख्येचा पाठिंबा मिळत आहे. रशियाच्या अध्यक्षीय कार्यालयाचा दावा आहे, की पुतिन विशेष लष्करी कारवाई करून युक्रेनच्या लोकांना फॅसिस्ट सरकारपासून मुक्त करण्याचे काम करत आहेत.

‘रशिया युद्ध सुरू करत नाही, ते संपवत आहे’ (Russia Ukrain War)

रशियातील लोक क्रेमलिनच्या या दाव्याला पाठिंबा देतात असे दिसते. रशियन सरकारी एजन्सीने केलेल्या सर्वेक्षणात असेही समोर आले आहे की रशियन जनतेचा असा विश्वास आहे की युक्रेनमध्ये कारवाई करून रशिया डॉनबास प्रदेशातील रशियन भाषिक लोकांचे संरक्षण करत आहे. रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या मारिया झाखारोवा म्हणाल्या, ‘रशिया युद्ध सुरू करत नाहीये. तर तो युद्ध संपवत आहे.’ त्यामुळेच युद्धानंतर पुतिन यांची लोकप्रियता 60 टक्क्यांवरून 71 पर्यंत वाढली आहे.

संबंधित बातम्या

याआधी, क्रिमिया युक्रेनपासून (Russia Ukrain War) वेगळे झाल्यानंतरही रशियात पुतिन यांची लोकप्रियता लक्षणीयरीत्या वाढली होती. कीव सरकारपासून क्रिमियातील रशियन लोकांचे संरक्षण करणे आवश्यक आहे हे दाखविण्याचा प्रयत्नही त्या काळात रशियाकडून करण्यात आला. यानंतर रशियन जनता देशाचा झेंडा घेऊन रस्त्यावर उतरली आणि पुतिन यांची लोकप्रियता गगनाला भिडू लागली. युक्रेनमधील युद्धाचा आज 14 वा दिवस आहे आणि दोन्ही बाजूंमधील युद्धविरामाबाबत त्यांची भूमिका मवाळ झाल्याचे दिसत आहे. युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी आपला देश नाटोमध्ये सामील होणार नसल्याचे जाहीर केले आहे. रशियाचीही ही प्रमुख मागणी होती.

सुमी शहरातून भारतीयांचे स्थलांतर पूर्ण झाले

युक्रेनमधील ईशान्येकडील सुमी शहरातून भारतीयांसह लोकांना बाहेर काढण्याचे काम आता यशस्वीरित्या पूर्ण झाले आहे. “सुमारे 5,000 लोक आणि 1,000 हून अधिक खासगी वाहने लोकांच्या सुरक्षेत गुंतलेली आहेत,” असे युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांच्या कार्यालयाचे उपप्रमुख टायमोशेन्को यांनी आपल्या टेलीग्राम अकाउंट वरुन लोकांचे व्हिडिओ फुटेज पोस्ट करत सांगितले. मात्र, त्यांनी अधिक तपशील दिलेला नाही.

स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितले की, सोमवारी रशियन हवाई हल्ल्यात तीन मुलांसह 22 लोक मारले गेले. भारत सरकारने मंगळवारी सांगितले की युक्रेनच्या सुमी शहरात अडकलेल्या सर्व 694 भारतीय विद्यार्थ्यांना युक्रेन सरकारच्या पाठिंब्याने यशस्वीरित्या बाहेर काढण्यात आले आहे.

Back to top button