सांगली ; पुढारी वृत्तसेवा : रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाच्या भडक्यामुळे बाजारपेठेतही महागाई भडकली आहे. कोरोना संकटामुळे आधीच अनेक वस्तूंचे दर वाढले आहेत. त्यातच या युद्धामुळे अन्न-धान्यासह जीवनावश्यक वस्तूंची टंचाई निर्माण होऊ लागल्याने किंमती वाढू लागल्या आहेत.
युरोपातील अनेक देश गॅससाठी रशियावर अवलंबून आहेत. मात्र, निर्बंध वाढल्यास या देशांना गॅस पुरवठा अशक्य होईल. तसेच रशियातून कच्चे तेल निर्यातही प्रभावित झाली आहे. त्यामुळे कच्च्या तेलाच्या दरात वाढ होत आहे. त्याचा फटका भारताला बसून महागाई वाढणार आहे. गेल्या आठवड्यात गॅस महागला आहे.
या दोन्ही देशांतील जल आणि रेल्वे वाहतूक सध्या विस्कळित झाली आहे. त्यामुळे अनेक शिपिंग कंपन्या नकार देत आहेत. कोरोनामुळे माल वाहतूक खर्च दुप्पट झाला आहे. आता तेलाचे दर वाढल्याने हा खर्च आणखी वाढण्याची शक्यता आहे. तसेच खत निर्मितीच्या कच्च्या मालाचा रशिया पुरवठादार आहे. याचा अनेक देशांवर परिणाम होऊ शकतो.
युक्रेनमध्ये युद्धामुळे सूर्यफूल उत्पादन, प्रक्रिया ठप्प झाली आहे. भारतात 80 टक्के सूर्यफूल तेल युक्रेनधून येते. यामुळे सूर्यफूल तेलाचे दर गगनाला भिडतील. भारतात खनिज इंधन आणि तेल, मोती, मौल्यवान खडे, खते, मशिनरी आणि न्युक्लिअर रिअॅक्टरची रशियातून 50 टक्के आयात होते. युद्धामुळे भारताने या वस्तू इतर देशांतून आयात केल्यास किंमतीत 4 ते 6 टक्के वाढ होऊ शकते.
रशिया आणि युक्रेन चा गहू आणि मक्यासह अन्नधान्य पुरवठ्यात मोठा वाटा आहे. मात्र, आता या देशांतून धान्य पुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता आहे. सांगलीत गव्हाचे भाव 25 ते 35 रुपये किलोपर्यंत वाढले आहे. मिरची 350 रुपये किलो झाली आहे. पुढील महिन्यात ती 500 रुपये होईल, असे व्यापारी सांगत आहेत. मसाल्याच्या पदार्थांचे दरही वाढत आहेत.
युद्धामुळे जिल्ह्यात खाद्यतेलांची आवक घटली आहे. परिणामी लिटरमागे सुमारे 20 रुपयांची वाढ झाली आहे. युद्धाची परिस्थिती अशीच राहिली तर भाव आणखी वाढण्याची शक्यता आहे. सांगलीत फेब्रुवारीमधील आणि कंसात सध्याचे दर प्रती लिटरचे असे ः पामतेल – 135 (150), सोयाबीन – 152 (160), सूर्यफूल – 145 (165), शेंगदाणे – 160 (165). खाद्यतेलांच्या किंमती वाढल्याने हॉटेल व्यावसायिकांचेही बजेट कोलमडले आहे.
बेकरी, खानावळ, हॉटेलमध्ये खाद्यपदार्थांचे दर 20 ते 30 टक्क्यांनी वाढले आहेत. बेकरी, हॉटेल, खानावळ चालकांचा उत्पादन खर्च वाढला आहे. चिकन, मटण थाळीचे दर वाढले आहेत. चिकन प्रती किलो 240 रु. आणि मटण प्रती किलो 650 रु. झाले आहे. चिकन ताट 220 ते 250, मटण ताट 300 ते 350 रुपये झाले आहे.
सुरमई प्रती किलो 800 ते 900, पापलेट 800 ते हजार, बांगडा 120 ते 280 आणि कोळंबी 550 रु. असे दर झाले आहेत.
बाजारात कपडे, लहान मुलांची खेळणी, मोबाईल, अॅक्सेसरिज यांचे दर वाढले आहेत. एक वर्षांपासून पेट्रोल शंभरीपार झाले आहे. आता हा दर 110 रुपयांच्या जवळपास आहे. त्यामुळे रेल्वे, एस. टी., खासगी वाहतूक यांचा प्रवास महागला आहे. वडाप वाहतूकदारांकडून प्रवासदर वाढवले जात आहेत. फळांचे दर यापूर्वी 60 ते 70 रुपये किलो असायचे. मात्र, आता हेच दर 80 ते 100 प्रती किलोपर्यंत वाढले आहेत.
साठेबाजी करणार्यांवर कारवाईची मागणी
पुढील काही दिवस रशिया आणि युक्रेन यांच्यामध्ये युद्ध चालेल. परिणामी सर्वच जीवनावश्यक वस्तूंची कमतरता जाणवेल, असा अंदाज आहे. यातून मागणी आणि पुरवठा यातील समतोल बिघडत चालला आहे. त्यामुळे व्यापारी साठेबाजी करू लागले आहेत. सरकारने यांच्यावर कारवाई करण्याची मागणी ग्राहकांतून होत आहे.