कीव्ह; पुढारी ऑनलाईन
Ukraine conflict : रशियाने युक्रेनमधील कीव्ह, चेर्निहीव्ह, सुमी, खार्किव्ह, मारियुपोल या ५ शहरांत मानवतावादी कॉरिडॉरसाठी तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा केली आहे. मंगळवारी सकाळी १० वाजल्यापासून (मॉस्को वेळेनुसार) या शहरांत मानवतावादी कॉरिडॉर खुला केला जाईल, असे रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेले निवेदनात म्हटले आहे.
काल सोमवारी बेलारूसमध्ये रशिया आणि युक्रेनमध्ये चर्चेची तिसरी फेरी पार पडली. त्यानंतर रशियाने पाच शहरांत तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा केली आहे. तिसऱ्या फेरीतही युद्ध पूर्णपणे थांबविण्यावर द्विपक्षीय तोडगा काढण्यात अपयश आले आहे. नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्याच्या मुद्यांवर या बैठकीत चर्चा झाली. मानवतावादी कॉरिडॉर मंगळवारपासून खुला होईल, यावर रशियाने सहमती दर्शवली आहे.
"८ मार्च २०२२ रोजी सकाळी १० वाजल्यापासून (मॉस्को वेळ) युद्ध थांबवले जाईल, असे रशियाकडून सांगण्यात आले आहे. या दरम्यान कीव्ह, चेर्निहीव्ह, सुमी, खार्किव्ह आणि मारियुपोल शहरांतील नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी मानवतावादी कॉरिडॉर खुला केला जात असल्याचे रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.
"युक्रेनकडून नियोजित मानवतावादी कॉरिडॉरबाबत पूर्वसूचना देण्याची गरज असल्याचे रशियाने निवेदनात म्हटले आहे, तसेच युक्रेनकडून प्रस्तावित मानवतावादी कॉरिडॉरच्या लेखी मंजुरीची मागणी करण्यात आली आहे. तसेच युक्रेनियन अधिकार्यांनी मानवतावादी कॉरिडॉरच्या मार्गांवर सुरक्षिततेची हमीदेखील दिली आहे.
दरम्यान, युक्रेनचे परराष्ट्र मंत्री दिमित्रो कुलेबा यांनी १० मार्च रोजी रशियाचे परराष्ट्र मंत्री सेर्गेय लावरोव्ह यांची भेट घेणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
रशिया-युक्रेन युद्धात (Ukraine conflict) सोमवारी १२ व्या दिवशीही रशियाचे युक्रेनवर हल्ले सुरूच राहिले. युक्रेनमधील अनेक शहरे उद्ध्वस्त झाली आहेत. संयुक्त राष्ट्राच्या माहितीनुसार आतापर्यंत युक्रेनच्या १७ लाखांहून अधिक नागरिकांनी शेजारी देशांमध्ये स्थलांतर केले आहे. या युद्धात अनेक जवान, महिला, बालकांचा मृत्यू झाला आहे. तथापि, युद्धात अत्याचार करणार्या सर्वांना धडा शिकविण्याची प्रतिज्ञा युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोल्दोमिर झेलेन्स्की यांनी केली आहे. 'ना माफ करणार, ना विसरणार', अशी घोषणाच झेलेन्स्की यांनी केली आहे.