
मुंबई; पुढारी वृत्तसेवा : रशिया-युक्रेन युद्धामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाचे दर भडकल्यामुळे आंतरराष्ट्रीय विमान प्रवास महागला आहे. देशांतर्गत विमान प्रवासासाठीही जादा पैसे मोजावे लागत असले, तरी प्रवाशांच्या संख्येतील वाढ, हे त्याचे कारण असल्याचे सांगितले जाते. कोविड महामारीच्या तिसर्या लाटेदरम्यान निर्बंधांमुळे विमान प्रवाशांची संख्या कमी झाल्याने देशांतर्गत हवाई प्रवास स्वस्त झाला होता. आता रशिया-युक्रेन युद्धाच्या परिणामी खनिज तेलाचे भाव कडाडल्याने विमानाचे इंधन (एटीएफ) महागले. त्यामुळे आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांनी या आठवड्यातच प्रवास भाड्यात वाढ केली आहे. युद्ध दीर्घकाळ सुरू राहिल्यास इंधनदर आणखी वाढून आंतरराष्ट्रीय विमान प्रवास आणखी महागण्याची दाट शक्यता आहे.
देशांतर्गत विमान प्रवासही महाग झाला आहे. प्रवासाच्या 15 दिवसांपूर्वी तिकिटेआरक्षित केल्यास विमान कंपन्या भाड्यात मोठी सवलत देतात; मात्र हा काळ जसजसा कमी होतो, तसतसे भाडे वाढत जाते. यापूर्वी 15 दिवसांनंतरचे मुंबई- दिल्ली विमानाचे तिकीट 5,500 रुपयांत मिळत होते; आता 20 मार्चनंतरच्या तिकिटासाठी दुप्पट म्हणजे तब्बल 10,500 रुपये मोजावे लागतील. त्याचप्रमाणे 15 दिवस अगोदर आरक्षण करूनही मुंबई- कोची-मुंबई विमान प्रवासभाडे 4,300 रुपयांवरून साडेतीन पट वाढून थेट 15 हजार रुपयांवर गेले आहे.
कोरोनाचे निर्बंध उठवल्यामुळे सध्या देशांतर्गत विमानप्रवाशांची संख्या वाढली आहे. त्यामुळे विमान कंपन्यांनी भाडे वाढवले आहे, असे ट्रॅव्हल एजंट्स असोसिशन ऑफ इंडियाचे उपाध्यक्ष जय भाटिया यांनी सांगितले. देशांतर्गत विमान प्रवासाच्या भाड्यावर इंधन दरवाढीचा परिणाम दिसू लागण्यास आणखी काही दिवस लागतील, असे ट्रॅव्हल एजंट्स सांगतात. त्यामुळे देशांतर्गत विमान प्रवास आणखी महाग होण्याची चिन्हे आहेत. चालू आर्थिक वर्षात देशांतर्गत प्रवासी विमान वाहतुकीत 50 ते 55 टक्के वाढ होईल, असा अंदाज 'इक्रा' या क्रेडिट रेटिंग एजन्सीने वर्तवला आहे.
या वाढीनंतरही विमानप्रवाशांची संख्या कोविडपूर्व काळापेक्षा कमीच राहील. मात्र कोरोनाकाळात बसलेल्या तडाख्यातून सावरण्यासाठी विमान कंपन्या भाडेवाढ करतील, अशीच शक्यता दिसते.