
सातारा पुढारी वृत्तसेवा: आकाशात सतत घिरट्या घालणारी विमाने अन् सतत कानावर पडणारे सायरनचे आवाज यामुळे आम्ही भीतीच्या छायेखाली वावरत होतो. विमानांच्या आवाजाने अक्षरशः अंगाचा थरकाप उडायचा. युद्ध परिस्थितीमुळे मेस व बाजारपेठा बंद असल्याने खाण्या-पिण्याची आबाळ झाली होती. मिळेल ते खाऊन बंकरमध्ये दिवस काढण्याशिवाय पर्याय नव्हता, असा थरारक अनुभव सांगताना माण तालुक्यातील सौरभ जाधवच्या अंगावर अक्षरश: काटा आला.
माण तालुक्यातील काळचौडी येथील माध्यमिक शिक्षक बाळासाहेब जाधव यांचा मुलगा सौरभ हा नोव्हेंबर 2021 पासून युक्रेन मधील लव्हीव शहरात वैद्यकीय शिक्षण घेत आहे. तो युक्रेनमध्ये अडकून पडला होता. शनिवारी सौरभ सुखरुपपणे आपल्य गावाकडे मार्गस्थ झाला असून रविवारी तो पोहोचत आहे.
पुणे विमानतळावर उतरल्यानंतर 'दै. पुढारी'शी बोलताना त्याने युद्धातील चित्तथरारक अनुभव कथन केले. तो सांगत होता, उणे तापमानात करावी लागलेली पायपीट, जीव मुठीत धरुन करावा लागलेला प्रवास, कुटुंबियांशी तुटलेला संपर्क अशा युद्धजन्य परिस्थितीत अडकलेल्या सर्वच विद्यार्थ्यांना युक्रेनमधून भारतात येण्याची आस लागली होती. अखेर केंद्रशासनाच्या सहकार्याने आम्ही आज सुखरूप मायदेशात पोहोचलो.
सौरभ म्हणाला, आम्ही रहात असलेल्या होस्टेलमध्ये जवळपास 300 विद्यार्थी रहात आहेत. साधारण दहा फेब्रुवारीच्या आसपास रशियाने युद्धाची घोषणा केल्यानंतर अनेक देशातील विद्यार्थी आपापल्या देशात निघून गेले. परंतु युद्धपरिस्थिती गंभीर बनल्याने 18 फेब्रुवारी रोजी भारतीय दूतावास कार्यालयाने युक्रेनमध्ये असलेल्या भारतातील नागरिकांना युक्रेन सोडण्यास सांगितले.
त्यानंतर आम्ही विमान तिकीट काढण्यासाठी प्रयत्न करत होतो, परंतु तिकीट मिळत नव्हते, त्यातच 24 फेब्रुवारी रोजी रशियाने युक्रेनची राजधानी किव्ह विमानतळावर हल्ला केल्याने विमानसेवा ठप्प झाली. याचदरम्यान रशियाने हल्ले वाढवल्याने सर्वजण भयभीत झालो. रशियन विमाने आकाशातून घिरट्या घालत असल्याने आमच्या अंगाचा थरकाप उडायचा.
विमानाच्या आवाजाने काळजाचे पाणी व्हायचे. याचवेळी शहरातून सायरनचे मोठे मोठे आवाज करत गाड्या फिरत असल्याने बाहेर पडणे अशक्य झाले होते. बाजारपेठा, दुकाने, कॉलेजची मेस बंद झाल्याने खण्यापिण्याची आबाळ झाली. हल्ल्याच्या भितीपोटी कॉलेजच्या बंकरमध्ये विद्यार्थ्यांनी आश्रय घेतला.
जवळ असलेली बिस्किटे, स्नॅक्स खाऊन प्रसंगी उपाशीपोटी राहून आम्ही अक्षरशः जीव मुठीत धरून दिवस काढले. बंकरमध्ये काढलेले 36 तास क्षणाक्षणाला मायभूमीची आठवण करून देत होते.
भारताने युक्रेनच्या बाजूने मतदान न केल्याने पोलंडच्या सीमेवर भारतीय विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारला गेला. याशिवाय युक्रेन सैनिकांकडून त्याठिकाणी विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण करण्यात येत होती. त्यामुळे पोलंड सीमेवर आठ-नऊ तास ताटकळत थांबून आम्ही पुन्हा हुडहुडी भरणार्या थंडीत 20 किलोमीटरची पायपीट करून पुन्हा लव्हीव शहर गाठले.
तेथून आम्ही लव्हीव ते हंगेरीपर्यंत पोहोचलो. तेथून भारतीय दुतावासाने केलेल्या सुविधेमुळे विशेष विमानाने शुक्रवारी 4 मार्च रोजी दिल्लीत सुखरूप सोडले. केंद्र सरकारने दिल्लीत महाराष्ट्र सदन याठिकाणी आमची राहण्याची सोय केली होती. त्यानंतर दिल्लीहून विमानाने आम्हाला पुण्यात सोडले असून शनिवारी मी माण तालुक्यातील गावी पोहोचणार असल्याचे सौरभने 'पुढारी'शी बोलताना सांगितले.
तत्पर प्रशासन यंत्रणेमुळे विद्यार्थी सुखरुप
युद्ध परिस्थितीत युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांच्या संपर्कात भारतीय प्रशासन होते. युक्रेनमधील भारतीय दुतावासामार्फत विद्यार्थ्यांना सतत संपर्क करून दिलासा देण्यात येत असल्याचे सौरभने सांगितले. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने हंगेरीमध्ये विद्यार्थ्यांच्या राहण्याची सोय, विमानसेवेची सोय केल्याने अडकलेले विद्यार्थी सुखरूप घरी परतले आहेत.
महाराष्ट्र शासनाचे अधिकारी तसेच सातारा जिल्हाधिकारी शेखर सिंह सतत माझ्यासह कुटुंबियांच्या संपर्कात होते असेही सौरभने सांगितले.
देशातच वैद्यकीय शिक्षणाची सोय आवश्यक
आपल्या देशातील वैद्यकीय शिक्षण महागडे असल्याने आम्ही मुलाला युक्रेनमध्ये शिक्षणासाठी पाठवले आहे. भारतामध्ये कमी खर्चात व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करुन वैद्यकीय शिक्षणाची सुविधा मिळणे आवश्यक असल्याचे मत सौरभचे वडील बाळासाहेब जाधव यांनी व्यक्त केले.
युक्रेनच्या युद्ध परिस्थितीतून मुलगा सुखरूप परत येण्यासाठी सहकार्य केल्याबद्दल त्यांनी प्रशासकीय यंत्रणेस धन्यवाद दिले. तसेच याकामी माणच्या यापूवीच्या तहसीलदार सुरेखा माने यांनी वेळोवेळी प्रशासन यंत्रणेशी संपर्क साधून आम्हाला मदत केल्याचे सौरभचे आई-वडील बाळासाहेब जाधव व शोभा जाधव यांनी सांगितले.
हेही वाचा