

पुढारी ऑनलाईन डेस्क : रशिया-युक्रेन युद्धाच्या ( russia ukraine war ) काळात क्रिप्टोकरन्सीचीही ( cryptocurrency ) बरीच चर्चा होत आहे. एकीकडे, रशियावरील आर्थिक निर्बंध लादले जात असताना रशिया क्रिप्टोकरन्सीकडे पर्याय म्हणून पाहत आहे. दुसरीकडे, युक्रेन क्रिप्टो एक्सचेंजेसना रशियाविरुद्ध कारवाई करण्याचे आवाहन करत आहे. दरम्यान, क्रिप्टोकरन्सीचा भाव चांगलाच वाढताना दिसत आहे. जगातील सर्वात मोठी, सर्वात जुनी व सर्वात लोकप्रिय असणाऱ्या क्रिप्टोकरन्सी बिटकॉइनची किंमत गेल्या २४ तासात १५ टक्क्यांनी वाढली आहे. याशिवाय इतर अनेक क्रिप्टोकरन्सीमध्येही उसळी दिसून आली आहे.
क्रिप्टोकरन्सी रशियाला किती मदत करेल ( russia ukraine war )
तज्ञांचे म्हणणे आहे की रशियाकडे आर्थिक निर्बंध मोडण्यासाठी क्रिप्टोकरन्सी हा एकमेव पर्याय ठरु शकणार नाही. अमेरिका, यूके, युरोपियन युनियन आणि कॅनडा यांनी सोमवारी रशियावर नवीन निर्बंधांची घोषणा केली. यावेळी रशियाची सेंट्रल बँक आणि नॅशनल वेल्थ फंडला लक्ष्य करण्यात आले आहे. अमेरिकेच्या ट्रेझरी डिपार्टमेंटने म्हटले आहे की, ते रशियाच्या 630 अब्ज डॉलर परकीय चलनाचा साठा वापरण्याची अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची क्षमता मर्यादित करत आहेत. अमेरिका आणि त्याच्या सहयोगी देशांनी काही रशियन बँकांना SWIFT (Society for Worldwide Interbank Financial Telecommunication) मधून बाहेर काढल्याच्या एका दिवसानंतर असे पाऊल उचलण्यात आले. SWIFT चा वापर डॉलर्सच्या व्यवहारांसाठी केला जातो.
रशिया-युक्रेन युद्ध आणि देशावर लादलेल्या निर्बंधांमुळे रशियन अर्थव्यवस्थेचे मोठे नुकसान होत आहे. सोमवारी, रुबल सर्वकालीन नीचांकावर आला. मध्यवर्ती बँकेने आपला प्रमुख व्याजदर 20 टक्क्यांपर्यंत वाढवला आणि स्टॉक एक्सचेंज बंद राहिले.
आर्थिक निर्बंधांचा व्यवहारांच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो. इराण आणि उत्तर कोरिया या दोन्ही देशांनी निर्बंध मोडण्यासाठी क्रिप्टोकरन्सीचा वापर केला आहे. क्रिप्टोकरन्सी आर्थिक व्यवस्थेच्या सीमेबाहेर काम करतात. क्रिप्टोचा वापर निर्बंधातून वाचण्यासाठी आणि निधी लपवण्यासाठी केला जाऊ शकतो. मात्र, रशियाचे प्रकरण वेगळे असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. मोठ्या अर्थव्यवस्थेसह आणि डिजिटल चलनांचा मर्यादित अवलंब केल्यामुळे, क्रिप्टोला निर्बंध टाळण्यास फार कमी जागा आहे.
युक्रेनला केवळ जमिनीवरच नव्हे, तर क्रिप्टोसारख्या आभासी प्लॅटफॉर्मवरही रशियाचे नुकसान करायचे आहे. युक्रेनचे उपपंतप्रधान मिखाइलो फेडोरोव्ह यांनी अलीकडेच ट्विटरवर सांगितले की त्यांनी सर्व प्रमुख क्रिप्टो एक्सचेंजेसना रशियन वापरकर्त्यांना ब्लॉक करण्याचे आवाहन केले आहे. तसेच त्यांनी रशिया आणि बेलारूसमधील राजकारण्यांच्या डिजिटल वॉलेटबद्दल माहिती देणाऱ्यांना बक्षीस देण्याचीही ऑफर दिली आहे.
रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर अनेकांनी युक्रेनला क्रिप्टोकरन्सीच्या स्वरूपात मदत केली आहे. युक्रेन सरकारला लाखो डॉलर्सचे क्रिप्टो देणगी मिळाले आहे. युक्रेनला मदत करण्यासाठी अनेक क्रिप्टो एक्सचेंजेसनी क्रिप्टो दान केले आहेत. क्रिप्टो एक्सचेंज बायनान्सशी (Binance) संबंधित एका ट्विटर हँडलवरून सांगण्यात आले की ते युक्रेनला मदत करण्यासाठी 10 दशलक्ष डॉलर्स दान करत आहेत.
रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर जवळपास सर्व क्रिप्टोकरन्सीमध्ये मोठी घसरण झाली. पण आता क्रिप्टोकरन्सीमध्ये तेजी आल्याचे दिसत आहे. क्रिप्टो एक्सचेंज वझीरएक्सच्या मते, दुपारी 1.26 वाजता बिटकॉइन 11.71 टक्क्यांची उसळी घेत 43,355 डॉलर म्हणजे 33,76,000 रुपयांवर व्यवहार करत होता. जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी क्रिप्टो इथर (इथर) 2916 डॉलरवर वर म्हणजेच 227179 रुपयांवर 9.34 टक्के वाढीसह ट्रेड करताना दिसला. याशिवाय Mime Crypto Dogecoin 4.92 टक्के आणि शिबा इनू (Shiba Inu) यांच्यात 7.16 टक्क्यांची वाढ दिसली. त्याच वेळी, मिम क्रिप्टो शिबा इनूमध्ये 10 टक्क्यांची उसळी घेतल्याचे दिसून आले.