युक्रेन संकट : सलग तिसऱ्या दिवशी पंतप्रधानांनी घेतली उच्चस्तरीय बैठक | पुढारी

युक्रेन संकट : सलग तिसऱ्या दिवशी पंतप्रधानांनी घेतली उच्चस्तरीय बैठक

नवी दिल्ली ; पुढारी वृत्तसेवा  युक्रेनच्या युद्धभूमीत अडकून पडलेल्या भारतीय विद्यार्थ्यांच्या स्थितीसंबंधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (मंगळवार) पुन्हा एकदा उच्च स्तरीय बैठकीतून आढावा घेतल्याचे कळते. विशेष म्हणजे आज सकाळी युक्रेनच्या खारकीवमध्ये एका भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांची बैठक महत्वाची होती. गेल्या दोन दिवसांमध्ये चौथ्यांदा पंतप्रधानांनी उच्चस्तरीय बैठकीतून युक्रेनमध्ये अडकून पडलेल्या भारतीयांच्या स्थितीसंबंधी आढावा घेत अधिकारी तसेच केंद्रीय मंत्र्यांना योग्य ते निर्देश दिल्याचे कळतेय.

परराष्ट्र मंत्री अरिंदम बागची यांनी ट्विट करीत भारतीय विद्यार्थ्यांच्या मृत्यूची माहिती दिली. रशियाच्या युक्रेनवरील हल्ल्यानंतर पहिल्यांदाच एका भारतीयाचा मृत्यू झाल्याचे ते म्हणाले. कर्नाटकच्या हावेरीचा रहिवासी नवीन युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षण घेत होता. जेवण आणण्यासाठी घराबाहेर पडला असताना रशियन सैनिकांच्या गोळीबारात त्याचा मृत्यू झाल्‍याची माहिती समोर आली आहे. पंतप्रधानांनी नवीनच्या कुटुंबियांना फोन करून त्यांच्या सहवेदना व्यक्त केल्या आहेत.

यापूर्वी सोमवारी रात्री उच्च स्तरीय बैठकीतून पंतप्रधानांनी युक्रेन तसेच रशिया दरम्यान असलेल्या तणावासह युद्धभूमित अडकलेल्या भारतीयांना सुरक्षित मायदेशी घेवून येण्यासंबंधी सरकारकडून करण्यात आलेल्या तयारी संबंधीचा आढावा घेतला होता. अतिसंवेदनशील भागांमध्ये अडकलेल्या भारतीयांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी आखण्यात आलेल्या रणनीतीची माहिती बैठकीतून अधिकाऱ्यांनी पंतप्रधानांना दिली होती.

Back to top button