तुम्ही वरळीतून लढता की, मी ठाण्यातून लढू ! आदित्य ठाकरेंचे एकनाथ शिंदेंना आव्हान

आदित्य ठाकरे
आदित्य ठाकरे
Published on
Updated on

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मी वरळीमधून माझ्यासमोर विधानसभा निवडणूक लढवून दाखवावी, असे आव्हान दिले, परंतु त्यांनी ते स्वीकारले नाही. ते वरळीमधून निवडणूक लढवायला तयार नसले तरी मी ठाण्यात त्यांच्यासमोर निवडणूक लढवायला तयार आहे, असे आव्हान शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरे यांनी दिले.

नाशिकरोड येथील आनंदऋषी शाळेजवळील मैदानात सोमवारी (दि. ६) सायंकाळी आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी ठाकरे म्हणाले की, मुंबईप्रमाणे ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. विधानसभेत तेथे भगवाच फडकेल, असा ठाम विश्वास आहे. मी महाराष्ट्रात फिरतो आहे. जनतेला गद्दारी आवडलेली नाही. ४० गद्दारांना जनता मतदारसंघात फिरू देत नाही. त्यांना उद्देशून 'पन्नास खोके एकदम ओके' अशा घोषणा दिल्या जातात. सहा महिन्यांत शिवसेनेच्या सभेला प्रचंड गर्दी होते आहे. जनता उध्दव ठाकरे यांच्यासोबत असल्याचे सांगते. भाजपाचा आयटी सेल देशभरात माझी बदनामी करीत आहे. सोशल मीडियावर मला शिव्या दिल्या जात आहेत. पण माझे रक्त बाळासाहेबांचे आहे. गद्दारी, धोका आमच्या रक्तात नाही.

नाशिक हे माझे आवडते शहर आहे. लहानपणापासून मी येथे येतोय, पूर्वी विकास होत होता, पण मागील दहा वर्षांत ब्ल्यू प्रिंट अन् नाशिक दत्तक घेणाऱ्यांनी नाशिकचा शास्वत विकास केला नाही. आताचे नाशिक भकास वाटते. तरुण, तरुणींनी पुढच्या पन्नास वर्षांचा विचार करायला हवा, असे ठाकरे यांनी म्हटले. सुधाकर बडगुजर यांनी प्रास्ताविक केले. नाशिकरोड परिसरातून शिंदे गटात गेलेल्या काही माजी नगरसेवकांसाठी हा मेळावा असून, त्यांचा पराभव निश्चित असल्याचे त्यांनी सांगितले.

माजी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता गायकवाड यांनी गद्दारांना जनता त्यांची जागा दाखवून देईल. आगामी नाशिक महापालिकेत आम्ही पुन्हा शिवसेनेचा भगवा फडकून दाखऊ असा शब्द आदित्य ठाकरे यांना दिला. माजी मंत्री बबन घोलप, वसंत गिते यांची यावेळी भाषणे झाली. याप्रसंगी जिल्हाप्रमुख विजय करंजकर, सुनील बागूल, शुभांगी पाटील, योगेश घोलप, विलास शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.

गितेंचे घोटाळे काढणार : दानवे

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी उध्दव ठाकरेंना सोडून जाणाऱ्यांवर सडकून टीका केली. नाशिकमध्ये जे घडले ते सोडा, तुम्ही पक्ष संघटना मजबूत करा, नाशिक मनपाकडे लक्ष पुरवा. येणाऱ्या काळात जिल्हा परिषद, पंचायत समिती आदी सर्वच ठिकाणी भगवा फडकविण्यावर लक्ष केंद्रीत करा, मनपा स्थायी समितीचे माजी सभापती गणेश गिते यांनी घोटाळे केलेले असून, ते बाहेर काढणार असल्याचा इशारा दानवे यांनी दिला.

नाशिककरांचाही विश्वास

मुंबईत जनतेचा जसा विश्वास आहे, तसाच नाशिकच्या जनतेचादेखील शिवसेनेवर विश्वास आहे. आगामी निवडणुकीतदेखील आमच्याकडे सत्ता येईल. नाशिकमध्येही शिवसेना पुन्हा भगवा फडकावेल, असा विश्वास अदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला. 

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news