Turkey Earthquake : तुर्कीला सातत्याने भूकंप का होतात? | पुढारी

Turkey Earthquake : तुर्कीला सातत्याने भूकंप का होतात?

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : तुर्की व सीरिया परिसरामध्ये नेहमीच भूकंपाचे धक्के जाणवत असतात. गेल्या 24 वर्षांत भूकंपामुळे तब्बल 18 हजार लोकांचा बळी गेला आहे. सोमवारच्या भूकंपात 1300 जण मरण पावले आहेत.

या भागात सातत्याने भूकंपाची ही कारणे (Turkey Earthquake)

1) तुर्कीत 4 टेक्टॉनिक प्लेटस एनाटोलियन प्लेटशी जुळतात, त्या ठिकाणी वसला आहे. यामुळे कोणत्याही प्लेटमध्ये जरा हालचाल झाली तरी भूकंपाचे धक्के बसतात.

2) तुर्कीचा मोठा भाग एनाटोलियन या एका प्लेटवर वसला आहे. यास लहान आशिया म्हणूनही ओळखले जाते. याच्या पूर्वेला एनाटोलियन फॉल्ट, अरेबियन प्लेट, दक्षिण-पश्चिमेला आफ्रिकन प्लेट आणि उत्तर दिशेला युरेशियन प्लेट आहे.

3) एनाटोलियन टेक्टॉनिक प्लेट ही घड्याळाच्या काट्याच्या उलट्या बाजूने फिरते. या प्लेटला अरेबियन प्लेट धक्का देत असते. मात्र युरेशियन प्लेट धडकल्यानंतरच भूकंपाचे धक्के बसत असतात. उल्लेखनीय म्हणजे एनाटोलियन टेक्टॉनिक प्लेट ही एक तरंगती प्लेट असून ती युरेशियन टेक्टॉनिक प्लेटमधून तुटून वेगळी झालेली आहे.

4) पृथ्वीच्या पोटात एकूण सात प्लेटस् आहेत. या प्लेटस् नेहमी गतिमान असतात. जेथे या टेक्टॉनिक प्लेटस् एकमेकांना धडक देतात, त्या भागाला फॉल्ट असे म्हटले जाते. ज्यावेळी प्लेटस एकमेकांना धडकतात, तेव्हा त्यातून निर्माण झालेली प्रचंड ऊर्जा बाहेर पडण्याचा प्रयत्न करते. तेव्हा जी हालचाल होते, त्या हालचालीस ‘भूकंप’ असे म्हटले जाते. भूकंपाचा केंद्रबिंदू हा पृथ्वीच्या वरच्या थरापासून जितका जवळ असतो, तेवढे नुकसान जास्त असते. मात्र, याचे क्षेत्रफळ कमी असते.

किती तीव्रतेवर काय होते?

0 ते 1.9 : रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाची जाणीव होत नाही.
2 ते 2.9 : रिश्टर स्केलच्या भूकंपाची फक्त जाणीव होते.
3 ते 3.9 : रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का जोराने बसतो.
4 ते 4.9 : रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाने तावदाने फुटतात.
5 ते 5.9 : घरातील साहित्य, आदी तसेच पंखेही थरथरू लागतात.
6 ते 6.9 : इमारतींच्या वरील मजल्याचे नुकसान होऊ शकते.
7 ते 7.9 : तीव्रतेच्या भूकंपाने इमारती कोसळू लागतात.
8 ते 8.9 : सुनामीचा धोका निर्माण होऊ शकतो. पूलही कोसळतात.
9 : जमीन हलताना दिसू शकते. जीवित व वित्तहानीही प्रचंड होते.

जगात दरवर्षी 20 हजार भूकंप

अर्थक्वेक इन्फॉर्मेशन सेंटर दरवर्षी जवळपास 20 हजार भूकंपांची नोंद करते. यापैकी 100 भूकंपांतील हानी जास्त असते. काही सेकंद वा काही मिनिटांपर्यंत धक्के बसतात. आजवरच्या इतिहासात सर्वाधिक वेळ हादरे देणारा भूकंप 2004 मध्ये हिंद महासागरात आला होता. दहा मिनिटे तो कायम होता.

Back to top button