नगर : टँकर निविदेला प्रतिसाद मिळेना; सोमवारपर्यंत मुदतवाढ

नगर; पुढारी वृत्तसेवा : टंचाईग्रस्त गावांत पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी टँकरची निविदा मागवली होती. परंतु पुरवठादार संस्थांकडून प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने ऑनलाईन निविदेला 13 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ दिली आहे.
सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झाल्यास जानेवारी, फेब्रुवारीपासूनच जिल्ह्यातील काही गावांत पाणीटंचाई निर्माण होते. त्यासाठी मोफत टँकरव्दारे पाणीपुरवठा करण्यासाठी टँकरची निविदा मागवली जाते.
परंतु गेल्या तीन वर्षांपासून जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली. त्यामुळे पाणीटंचाईग्रस्त गावांची संख्या कमी असते. एप्रिल व मे या दोन महिन्यांत 30 ते 40 गावांत पाणीटंचाई निर्माण होते. गेल्या उन्हाळ्यात 50 गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी निविदा मागवल्या होत्या. परंतु मोटार वाहतूकदार संस्थांकडून प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे शासकीय टँकरव्दारे पाणीपुरवठा करण्यात आला. या वर्षी देखील एप्रिल व मे महिन्यांत पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.
जून महिन्यात पावसाने दडी मारल्यास टंचाईग्रस्त गावांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून जिल्हा प्रशासनाने 3 फेब्रुवारीपर्यत टँकरसाठी ऑनलाईन निविदा मागवली होती. परंतु खासगी मोटार वाहतूकदार संस्थांनी प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे एकही निविदा दाखल झाली नाही.
त्यामुळे जिल्हा प्रशासनाने या निविदेला 13 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ दिली आहे. गेल्या वर्षी पाऊसपाणी भरपूर होता. त्यामुळे टंचाईग्रस्त गावांची संख्या कमी होती. यंदा देखील भरपूर पावसाची नोंद झाली. त्यामुळे टंचाईग्रस्त गावांची संख्या कमीच असणार आहे. त्यामुळे यंदा देखील टँकर निविदेला किती प्रतिसाद मिळतो याकडे लक्ष लागले आहे.