

पुढारी ऑनलाईन डेस्क : ICC Rankings : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात कसोटी मालिका होणार असून त्यात दोन सामने खेळले जाणार आहेत. त्याचबरोबर ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात अॅशेस मालिकाही सुरू आहे. दरम्यान, आयसीसी कसोटी क्रमवारीतही आगामी काळात मोठा बदल पाहायला मिळू शकतो. टीम इंडिया सध्या आयसीसी कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानावर विराजमान आहे, पण हे स्थान अधिक काळ टिकेल की नाही याबाबत शंका निर्माण झाली आहे. ऑस्ट्रेलियाने जर ॲशेसमधील पहिली कसोटी जिंकली तर मात्र, टीम इंडियावरील संकट अधिकच गडद होईल.
आयसीसी कसोटी क्रमवारीत सध्या टीम इंडिया पहिल्या क्रमांकावर आहे. भारतीय संघाचे रेटिंग 121 आणि ऑस्ट्रेलियाचे 116 आहे. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपपासून या क्रमवारीत बदल झालेला नाही. जर ही क्रमवारी अपडेट केली तर भारत आणि ऑस्ट्रेलियाचे रेटिंग समान होतील. कारण टीम इंडियाला डब्ल्यूटीसीच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागला आहे. पण गुण अधिक असल्याने टीम इंडिया पहिल्या क्रमांकावर आहे. दरम्यान, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात खेळल्या जात असलेल्या कसोटी मालिकेचा निकाल मंगळवारी लागणार आहे. आतापर्यंत ज्या पद्धतीने सामना सुरू आहे, त्यामुळे सामना अनिर्णित राहण्याची शक्यता कमी आहे. ऑस्ट्रेलियन संघाने हा सामना जिंकला तर कांगारू संघाचे रेटिंग आणखी वाढेल. म्हणजेच यानंतर टीम इंडियाची सहज दुसऱ्या क्रमांकावर घसरण होईल.
जर टीम इंडियाला अव्वल स्थानी राहायचे असेल, तर आधी ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात खेळल्या जाणाऱ्या मालिकेतील किमान पहिले दोन सामने इंग्लंडने जिंकणे आवश्यक आहे. त्यानंतर भारताला विंडिजविरुद्धचे दोन्ही कसोटी सामने जिंकावे लागतील. असे झाले असते तर अव्वल स्थान कायम राहण्याची शक्यता आहे. पण दुसरीकडे जर इंग्लंडने आपली विजयी मालिका सुरूच ठेवली आणि त्याचदरम्यान, टीम इंडियाचा विंडिजकडून पराभव झाला, तर मात्र इंग्लिश संघ पहिल्या क्रमांकावर झेपावू शकतो. इंग्लंडचे रेटिंग 114 असून हा संघ तिसऱ्या क्रमांकावर आहे.