ODI World Cup : वर्ल्डकपमध्ये अफगाणिस्तानविरुद्ध खेळायची पाकिस्तानला धास्ती!

ODI World Cup : वर्ल्डकपमध्ये अफगाणिस्तानविरुद्ध खेळायची पाकिस्तानला धास्ती!

पुढारी ऑनलाईन डेस्क : ODI World Cup : 2023 च्या वर्ल्ड कपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना 15 ऑक्टोबर रोजी नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाण्याची शक्यता आहे. त्या सामन्याच्या आयोजनावरून दोन्ही देशांमध्ये बराच वाद झाला होता. पण नंतर सर्व काही मिटले. मात्र, आता पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने नवा गदारोळ सुरू केला आहे.

पीसीबीने सुरू केला नवा गोंधळ

विश्वचषकाचे (ODI World Cup) वेळापत्रक जाहीर करण्यापूर्वी आयसीसीने पीसीबीसह सर्व सदस्य मंडळांकडून प्रस्तावित वेळापत्रकावर सूचना मागवल्या आहेत. पीसीबीमधील एका विश्वसनीय सूत्राने पीटीआयला सांगितले की, आयसीसी आणि बीसीसीआय वर्ल्डकपदरम्यान पाकिस्तानचे सामने कुठे आयोजित केले जातील याचे नियोजन करत आहेत. पण या ठिकाणांना मान्यता देण्याचे काम पीसीबीच्या सांख्यिकी, विश्लेषक आणि सांघिक रणनीती तज्ञ करणार आहेत.

सूत्राने सांगितले की, पीसीबीने संघाचे तात्पुरते वेळापत्रक निवडकर्त्यांकडे पाठवले आहे, जे पाकिस्तानच्या काही सामन्यांचे वेळापत्रक आणि स्थळाबद्दल सोयीस्कर नसल्याचे म्हटले आहे. उदाहरणार्थ, चेन्नईमध्ये अफगाणिस्तान आणि बंगळूरमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळण्यास त्यांनी आक्षेप घेतला आहे.

चेन्नईतील खेळपट्टी फिरकीला अनुकूल आहे. आयपीएल 2023 मध्ये गुजरात टायटन्सकडून खेळताना अफगाणिस्तानच्या राशिद खान आणि नूर अहमद या फिरकीपटूंनी चमकदार कामगिरी केली होती. जर पाकिस्तानसाठी चेन्नईचे मैदान ठरवण्यात आले तर त्यांना अफगाणि फिरकीपटूंचा सामना करावा लागणार आहे. ज्याची आतापासून पाकिस्तानने धास्ती घेतल्याची चर्चा आहे. दुसरीकडे बंगळूरची खेळपट्टी सर्वसाधारणपणे फलंदाजीला अनुकूल असते आणि चिन्नास्वामी स्टेडियमवर ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळण्यास पाकिस्तानला का आक्षेप आहे हे समजणे कठीण आहे. (ODI World Cup)

चेन्नईत खेळण्यास नकार

पीसीबीच्या एका सूत्राने सांगितले की, निवडकर्त्यांनी बोर्डाला चेन्नईला अफगाणिस्तानविरुद्धचे ठिकाण म्हणून न स्वीकारण्याचा सल्ला दिला आहे कारण हे ठिकाण फिरकीपटूंना अनुकूल आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या सामन्यांचे वेळापत्रक बदलून अफगाणिस्तानविरुद्धचा सामना बंगळूरमध्ये आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सामना चेन्नईमध्ये खेळवला जावा अशी मागणी आयसीसी आणि बीसीसीआयला करण्यात यावी असे सुचवले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news