Bhavani Devi Asian Championship : भवानी देवीने रचला इतिहास! ‘अशी’ कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय

Bhavani Devi Asian Championship : भवानी देवीने रचला इतिहास! ‘अशी’ कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय तलवारबाज भवानी देवीने (bhavani devi) सोमवारी आशियाई तलवारबाजी चॅम्पियनशिपमध्ये इतिहास रचला. तिने मिसाकी इमुरा हिला उपांत्यपूर्व फेरीत पराभूत करून पदक निश्चित केले आहे. या स्पर्धेतील भारताचे हे पहिलेच पदक ठरणार आहे. जपानची मिसाकी सध्या वर्ल्ड चॅम्पियन आणि नंबर वन तलवारबाज आहे. भवानीने मिसाकीचा 15-10 असा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. भवानीला अंतिम फेरीत प्रवेश मिळवण्यासाठी उझबेकिस्तानच्या झेनब डेबेकोवावर मात करावी लागणार आहे.

29 वर्षीय भवानीला राऊंड ऑफ 64 मध्ये बाय मिळाला होता. त्यानंतर तिने राऊंड ऑफ 32 मध्ये कझाकस्तानच्या डॉस्पे करिनाला पराभूत केले. प्री-क्वार्टर फायनलमध्ये तिने तिसऱ्या मानांकित ओझाकी सेरीचा 15-11 असा पराभव केला. त्यानंतर क्वार्टर फायनलमध्ये वर्ल्ड चॅम्पियन आणि नंबर वन तलवारबाज मिसाकीला धुळ चारून उपांत्य फेरी गाठून पदक निश्चित केले.

विशेष म्हणजे भवानीने 2004 मध्ये तिच्या करिअरची सुरुवात केली होती. त्यानंतर 2009 मध्ये तिने मलेशिया येथील स्पर्धेत कांस्यपदक जिंकून आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला सुरुवात केली. तिने 2012 मध्ये जर्सी कॉमनवेल्थ चॅम्पियनशिपमध्ये रौप्य आणि कांस्यपदक जिंकले आहे.

भवानीने 2017 मध्ये आईसलँडमध्ये तिची पहिली आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकून भारताचा नावलौकिक केला. 2018 मध्ये रेकजाविक येथे झालेल्या टूर्नोई सॅटेलाइट फेंसिंग चॅम्पियनशिपमध्ये ती रौप्य पदक मिळवण्यात यशस्वी झाली होती. तिने टोकियो ऑलिम्पिकमध्ये भाग घेतला होता पण पदकावर नाव कोरण्यात अपयश ठरली होती. तिने गेल्या टोकियो ऑलिम्पिकमधील पहिला सामना जिंकला होता पण दुसरा सामना गमावला. त्यामुळे ती स्पर्धेतून बाहेर पडली.

अर्जुन पुरस्काराने भवानीला सन्मानित करण्यात आले आहे. तिचा जन्म 27 ऑगस्ट 1993 रोजी तामिळनाडूची राजधानी चेन्नई येथे झाला. तिने मुरुगा धनुष्कोडी गर्ल्स हायर सेकंडरी स्कूलमधून बारावी आणि त्यानंतर सेंट जोसेफ अभियांत्रिकी महाविद्यालयातून पदवी पर्यंतचे शिक्षण घेतले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news