Joe Root Ashes 2023 : जो रूट ठरला सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज! | पुढारी

Joe Root Ashes 2023 : जो रूट ठरला सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज!

पुढारी ऑनलाईन डेस्क : Joe Root Ashes 2023 : इंग्लंड क्रिकेट संघाचा फलंदाज जो रूट सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे. ॲशेस मालिकेतील पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात त्याने सर्वोत्तम खेळी केली आणि ऑस्ट्रेलियन गोलंदाजांची धुलाई करत शानदार शतक झळकावले. इतकंच नाही तर दुसऱ्या डावातही त्याने चांगली सुरुवात केली आणि सामन्याच्या चौथ्या दिवशी डावाच्या सुरुवातीला त्याने ज्या प्रकारची आक्रमकता अवलंबली ती अत्यंत प्रशंसनीय होती. इतकेच नाही तर चौथ्या दिवशी डावाच्या सुरुवातीला स्कॉट बोलंडच्या चेंडूवर रिव्हर्स स्कूप शॉट मारून डोळ्याचे पारणे फेडणारा षटकार खेचला. याचबरोबर तो या वर्षात कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज बनला आहे.

जो रूटने मेंडिसला टाकले मागे (Joe Root Ashes 2023)

सामन्याच्या चौथ्या दिवशी जो रूट फलंदाजीला आला तेव्हा त्याने डावाच्या पहिल्याच चेंडूवर पॅट कमिन्सला रिव्हर्स स्कूप शॉट खेळण्याचा प्रयत्न केला, पण त्यात त्याला यश आले नाही. यानंतर खेळाच्या चौथ्या दिवसाचे दुसरे षटक टाकण्यासाठी स्कॉट बोलंड आला तेव्हा रूटने रिव्हर्स स्कूपचा तडाखा देत चेंडू सीमापार पाठवला. दुसऱ्या डावात 55 चेंडूत 46 धावा करून तो नॅथन लायनचा बळी ठरला.

रूटने त्याच्या डावाच्या सुरुवातीला षटकार मारल्यानंतर, त्याने या वर्षी कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम आपल्या नावावर केला. यापूर्वी हा विक्रम श्रीलंकेचा फलंदाज कुशल मेंडिसच्या नावावर होता. मेडिसने 4 कसोटीच्या 6 डावात 12 षटकार मारले आहेत. रूटने आता 13 षटकार मारून श्रीलंकन फलंदाजाला मागे टाकले आहे. या यादीत तिसऱ्या क्रमांकावर न्यूझीलंडचा अष्टपैलू डॅरिल मिशेल आहे, ज्याने यावर्षी 5 कसोटी सामन्यांच्या 9 डावात 10 षटकार ठोकले आहेत. (Joe Root Ashes 2023)

रूटने पहिल्या डावात ठोकले 4 षटकार

रूटने पहिल्या डावातही रिव्हर्स स्कूप शॉट मारले. त्याची खेळण्याची शैली पाहिल्यानंतर तो बेसबॉल स्टाइलमध्ये खेळत असल्याचे समजते. रूटने पहिल्या डावात 152 चेंडूत 118 धावा केल्या. या शतकी खेळीत त्याने 7 चौकार आणि 4 षटकार मारले.

Back to top button