

पुढारी ऑनलाईन डेस्क : ICC ODI Rankings : आयसीसीने बुधवारी जाहीर केलेल्या नवीन वनडे क्रमवारीत टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहलीने झेप घेतली असून भारतीय कर्णधार रोहित शर्माने धमाका केली आहे. श्रीलंकेविरुद्ध फटकावलेल्या शतकाचा किंग कोहलीला जबरदस्त फायदा झाला आहे. त्यामुळे तो दोन स्थानांची सुधारणा करत सहाव्या क्रमांकावर तर 83 धावांची वादळी खेळी खेळणारा हिटमॅन रोहित आठव्या स्थानी पोहचला आहे.
विराट आणि रोहित यांच्या रुपाने भारताच्या दोन फलंदाजांनी टॉप 10 मध्ये स्थान मिळवले आहे. गुवाहाटीमध्ये श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या वनडेत विराट कोहलीने 113 धावांची आक्रमक खेळी केली. कोहली हे वनडे कारकिर्दीतील 45 वे शतक ठरले. यानंतर आयसीसी फलंदाजांच्या क्रमवारीत 8 व्या स्थानावर असलेल्या कोहलीने दोन स्थानांनी झेप घेत सहावे स्थान गाठले. त्याचवेळी, एकदिवसीय फलंदाजांच्या ताज्या आयसीसी क्रमवारीत कर्णधार रोहित शर्माच्या क्रमवारीतही सुधारणा झाली. तो आठव्या क्रमांकावर पोहोचला.
आयसीसीच्या वन डे क्रमवारीत पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम 891 गुणांसह अव्वल स्थानावर विराजमान आहे. तर द. आफ्रिकेचा रसी व्हॅन डर डुसेनने (766) दुस-या आणि पाकिस्तानच्या इमाम-उल-हकने (764) तिस-या क्रमांकावर कब्जा केला आहे. यानंतर चौथ्या क्रमांकावर क्विंटन डी कॉक (759) आहे. ऑस्ट्रेलियाचा डेव्हिड वॉर्नर 747 गुणांसह पाचव्या क्रमांकावर असून त्याच्यानंतर सहाव्या स्थानी विराट कोहली (726) आहे. ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह स्मिथची (719) एका स्थानाने घसरण झाली आहे. आता सातव्या क्रमांकावर पोहचला आहे. यानंतर 715 गुणांसह रोहित शर्माने आठव्या क्रमांकावर झेप घेतली आहे. याशिवाय जॉनी बेअरस्टो (710) नवव्या आणि पाकिस्तानचा फखर जमान (695) दहाव्या क्रमांकावर आहेत. (ICC ODI Rankings)
भारताच्या मोहम्मद सिराजला श्रीलंकेविरुद्ध शानदार गोलंदाजीचा पुरस्कार मिळाला आहे. सिराजने चार स्थानांनी झेप घेतली असून तो आता 18व्या स्थानावर पोहोचला आहे. त्याने जसप्रीत बुमराहला मागे टाकले असून तो भारतीय गोलंदाजांमध्ये नंबर-1 बनला आहे. क्रमवारीत सिराजच्या वर एकही भारतीय गोलंदाज नाही. बुमराहला एका स्थानाचे नुकासान झाले आहे. तो आता 19 व्या क्रमांकावर पोहोचला आहे. श्रीलंकेविरुद्धच्या वन डे सामन्यात सिराजने 7 षटके टाकली आणि 4.3 च्या प्रभावी इकॉनॉमीने 30 धावांत दोन महत्त्वाचे बळी घेतले. त्याने अविष्का फर्नांडो आणि कुसल मेंडिसला माघारी धाडून भारताला चांगली सुरुवात करून दिली.
गोलंदाजी क्रमवारीत न्यूझीलंडचा ट्रेंट बोल्ट पहिल्या क्रमांकावर आहे. अष्टपैलू खेळाडूंच्या टॉप 10 मध्ये एकाही भारतीय खेळाडूचे नाव नाही. बांगलादेशचा शाकिब अल हसन पहिल्या क्रमांकावर आहे.