

केज (बीड), पुढारी वृत्तसेवा: लाडेवडगाव परिसरात ३ एप्रिल रोजी एका पुरुषाचा जळालेला अवस्थेतील मृतदेह आढळला होता. याप्रकरणी युसुफ वडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला हाेता. एएसपी पंकज कुमावत यांनी या गुन्ह्याचा छडा लावला असून, अनैतिक संबंधात अडथळा ठरत असल्याने पत्नीनेच प्रियकराच्या मदतीने खून केल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी मयताची पत्नी व तिच्या प्रियकराला अटक केली आहे. सुमिदा विठ्ठल धायगुडे, आणि रामदास किसन शितळकर (रा. औरंगपूर ता. केज) अशी संशयित आराेपींची नावे आहेत.
केज तालुक्यातील आडस- होळ रस्त्यावर ३ एप्रिलला सकाळी लाडेवडगाव परिसरात कडबा टाकून जळालेला मृतदेह आढळला होता. या घटनेने केज तालुक्यात खळबळ उडाली होती. मृतदेह पूर्णपणे जळालेला असल्याने ओळख पटवणे पोलिसांसमोर मोठं आव्हान होतं. या प्रकरणी युसुफ वडगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी डॉ. संदीप दहिफळे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपीविरोधात खूनाचा गुन्हा दाखल झाला हाेता.
काेणताही पुरावा नसताना मृतदेहाची ओळख पटवून हे माेठे आव्हान पाेलिसांसमाेर होते. एएसपी पंकज कुमावत यांनी तांत्रिक बाबी वापरुन प्रथम मृतदेहाची ओळख पटविली. हा मृतदेह केज तालुक्यातील औरंगपूर येथील विठ्ठल ( अशोक ) धायगुडे ( वय ३५ वर्ष ) यांचा असल्याचे निष्पन्न झाले.
पोलीसांनी विठ्ठलविषयी नातेवाईकांकडे चौकशी केली. घरातील व्यक्ती बेपत्ता असताना कोणाची तक्रार नाही. त्यामुळे पोलीसांना नातेवाईकांवरच संशय बळावला. या चौकशीतून पत्नीनेच अनैतिक संबंधात अडथळा ठरत असल्याने प्रियकराच्या मदतीने विठ्ठल ( अशोक ) धायगुडे याचा काटा काढल्याचे समोर आले. यावरून संशयित आरोपी पत्नी सुमिदा विठ्ठल धायगुडे, प्रियकर रामदास किसन शितळकर (रा. औरंगपूर ता. केज) यांना अटक केली आहे. या दोघांनाही आज न्यायालयासमोर उभे करण्यात येणार आहे.