पुढारी ऑनलाईन डेस्क : महाराष्ट्रात इंधनावरील व्हॅट कमी करण्यासंदर्भात मंत्रिमंडळात चर्चा करणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. तसेच महाराष्ट्रामधून जेवढा कर केंद्राला जातो तेवढ्या प्रमाणात परतावा मिळत नाही, अशी खंत अजित पवार यांनी व्यक्त केली. भाजपकडून महाविकास आघाडीवर इंधन दरवाढीवरून आरोप केले जात आहेत. परंतु केंद्रानेही कर (Tax) कमी करावा अशी मागणीदेखील त्यांनी यावेळी केली. परिस्थितीमुळं कधीकधी अशक्य वाटणारे निर्णय घ्यावे लागतात असं मतही यावेळी त्यांनी व्यक्त केलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक घेतली होती. इंधन दरावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिगरभाजपशासित राज्यांना आवाहन करताना इंधनावरील कर कमी करण्याच्या सुचना दिल्या आहेत. यानंतर राज्य सरकारकडूनही मोदींना प्रत्युत्तर देण्यात आले होते. आज अजित पवार यांनी इंधन कर कमी करण्यावर चर्चा होईल, असे सांगितले.
भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी आघाडी सरकारची २०१७ मध्येच सगळी तयारी झाली होती, असा गौप्यस्फोट भाजप नेते आशिष शेलार यांनी केला होता. यावर बोलत असताना अजित पवार यांनी या विधानाचा चांगलाच खरपूस समाचार घेतला. २०१७ च्या मुद्द्यावर शेलार आता का बोलत आहेत? महत्त्वाचे मुद्दे सोडून शेलार बाजूला का जात आहेत? असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला. मुलभूत प्रश्नांवर चर्चा झाली पाहिजे असं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं.
राज ठाकरेंनी युपीत मशिदीवरील भोंगे उतरविल्या बद्दल योगी सरकारचे अभिनंदन केलं. यावर बोलत असताना अजित पवार म्हणाले की, राज ठाकरेंनी वेळोवेळी भुमिका बदलेली आहे. महाराष्ट्रात हा मुद्दा काढण्याची काहीच गरज नव्हती. फुले, शाहू, आंबेडकर राज्यात हा मुद्दा चुकीचा आहे असं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं. महाराष्ट्रात अनेक मुद्दे आहेत. असे मुद्दे सोडून तुम्ही कोणता मुद्दा उचलत आहात. हनुमान चालिसा म्हणत भोंगा हा मुद्दा योग्य आहे का? सवालही त्यांनी केला.
हेही वाचा