गोव्यात रोनाल्डोच्या पुतळ्यावरून वाद | पुढारी

गोव्यात रोनाल्डोच्या पुतळ्यावरून वाद

पणजी ; पुढारी वृत्‍तसेवा

ग्रामीण विकास मंत्री मायकल लोबो यांनी पुढाकार घेत विरोध जुगारत उत्तर गोव्यातील कळंगुट मतदारसंघात जगप्रसिद्ध फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या पुतळा उभारला. मात्र, याला हिंदू संघटनांसह देशप्रेमी व समविचारी लोकांनी कडाडून विरोध दर्शविला आहे.
या पुतळ्या संदर्भात कळंगुट मतदारसंघ मंचने (सीसीएफ) हरकत घेत आक्षेप नोंदविला होता. जरी पुतळा उभारला गेला असला तरी, सीसीएफ याचा पाठपुरवा करणार असल्याचे या मंचच्या अध्यक्षांनी सांगितले आहे.

कळंगुटमधील युवकांना, तसेच इतर क्रीडा क्षेत्रातील खेळाडूंना प्रेरणा मिळावी, यासाठी ख्रिस्तियानो रोनाल्डोचा 450 किलो वजनाचा पुतळा कळंगुट, आगारवाडा येथील मुख्य जंक्शनवर बसविला आहे. मंगळवारी, 28 डिसेंबर 2021 रोजी, त्याचे अनावरणही झाले. मात्र, त्यानंतर या पुतळ्यावरून वाद निर्माण झाला. काही देशप्रेमी निदर्शकांनी अनावरणाच्या कार्यक्रमावेळी काळे झेंडे दाखवत आंदोलन केले होते. यावेळी आंदोलनकर्त्यांनी राज्य सरकारवर स्थानिक दिग्गज फुटबॉलपटूंकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला होता.

यासंदर्भात कळंगुट मतदारसंघ मंचचे अध्यक्ष प्रेमानंद दिवकर यांनी प्रतिक्रिया दिली की, या पुतळ्याबाबत आम्ही सर्व संबंधिताकंडे हरकत दाखल केली होती. मात्र, प्रशासनाने जाणीवपूर्वक याकडे दुर्लक्ष करीत, हा पुतळा बसविला. आमचा पुतळ्याला विरोध नाही, मात्र परप्रांतीय खेळाडूंचा कशाला?

ख्रिस्तियानो रोनाल्डो हा पोर्तुगीज फुटबॉलपटू असल्याने गोव्याच्या 60 व्या मुक्तिदिनाच्या वर्षात अशाप्रकारे पोर्तुगीज व्यक्तीचा उदोउदो करणे, हे निषेधार्ह असल्याचा आरोप करीत या समविचारांनी मंत्री मायकल लोबोंना काळे झेंडे दाखविले होते. सध्या हे प्रकरण काही प्रमाणात थंडावले असून, आता दोन दिवसांपूर्वीच कळंगुट किनार्‍यावरील सोझा लोबो रेस्टॉरंटमध्ये जमावांकडून झालेल्या तोडफोडवरून सध्या मंत्री मायकल लोबो हे लक्ष्य होताहेत.

दरम्यान, मंत्री मायकल लोबोंनी यावर भाष्य करताना काही राजकीय नेते खेळात राजकारण आणत आहेत. खेळात कोणीही राजकारण आणू नये. आणि आगामी निवडणुकावेळी या राजकारणाला वेळ द्यावा, असे सांगितले.

देशप्रेमींकडून निषेध…

भारतीय फुटबॉल संघाचे माजी कर्णधार तथा अर्जुन पुरस्कार विजेते ब्रुनो कुतिन्हो हे मूळचे कळंगुटचे आहेत. अशा खेळाडूंचा सन्मान करण्याऐवजी पोर्तुगालच्या ख्रिस्तियानोचा पुतळा उभारणे हे लांच्छनास्पद असल्याची टीका करीत या देशप्रेमींनी याचा निषेध केला होता.

Back to top button