

महूद ; पुढारी वृत्तसेवा : सायकल खेळत खेळत उभ्या असलेल्या ट्रॅक्टर-ट्रॉलीला पाठीमागून धडकून हँडल पोटात घुसल्याने गंभीर जखमी झालेल्या विद्यार्थ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी दुपारी 2 च्या सुमारास वाकी-हलदहिवडी (ता. सांगोला) रोडवरील कुंभार मळा येथे घडली.
संग्राम आप्पासाहेब शेजाळ (वय 10, रा. वाकी, कुंभार मळा) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. दरम्यान, वाकी विद्यामंदिर हायस्कूलच्या वतीनेमुख्याध्यापक रेवण आवताडे, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थ्यांच्यावतीने मृत संग्राम शेजाळ यास श्रद्धांजली वाहून शोक व्यक्त केला.
शुक्रवारी दुपारी 2 च्या सुमारास संग्राम शेजाळ त्याच्या घराजवळील वाकी-हलदहिवडी रस्त्यावर सायकल खेळत होता. खेळताखेळता त्याची सायकल रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीला पाठीमागून धडकली. अपघातात सायकलचे हँडल त्याच्या पोटात बेंबीपाशी खाली घुसल्याने तो गंभीर झाला. नातेवाईकांनी जखमी अवस्थेत त्यास तत्काळ उपचाराकरिता सोलापूर येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान रात्री त्याचा मृत्यू झाला.
वाकी येथील संग्राम आप्पासाहेब शेजाळ हा वाकी विद्या मंदिर हायस्कूलमध्ये चौथी इयत्तेत शिकत होता. तो शाळेत हुशार होता. शिवाय खेळातही प्राविण्य मिळवत असल्याने हुशार विद्यार्थी म्हणून त्यांची ओळख होती. दरम्यान, या अपघाताची नोंद उशिरापर्यंत सांगोला पोलिसांत झाली नव्हती.