चिमुरडा आई, वडिलांसह विवाह सोहळ्याला आला, अन् कोल्‍हापुरात हरवला, पुढे पोलिसमामा दिसताच… | पुढारी

चिमुरडा आई, वडिलांसह विवाह सोहळ्याला आला, अन् कोल्‍हापुरात हरवला, पुढे पोलिसमामा दिसताच...

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यातील हवालदार सुधीर हेगडे-पाटील, पोलिस राजेंद्र संकपाळ, युवराज सूर्यवंशी यांच्या सतर्कतेमुळे गर्दीत हरवलेल्या पाच वर्षांच्या चिमुरड्याचा शोध लागला. दोन- अडीच तासांपासून हरवलेल्या मुलाला साक्षात पाहताच आई, वडिलांच्या डोळ्यांतून अश्रूच्या धारा वाहू लागल्या. पोलिसदादांचे आभार मानताना दाम्पत्याचे डोळे पाणावले होते.

नातेवाईकाच्या विवाह सोहळ्यासाठी कणकवली (जि. सिंधुदुर्ग) येथील दाम्पत्य मुलासह कोल्हापुरात आले होते. लग्नमंडपात अन्य बालमित्रांसमवेत खेळत असतानाच पाच वर्षांचा चिमुरडा मंडपाबाहेर आला. दिसेल त्या रस्त्याने भटकू लागला. फिरत फिरत महापालिका परिसरात आला. वाहनांची गर्दी आणि नागरिकांच्या वर्दळीमुळे चिमुरडा अधिकच गोंधळला. आई, वडिलांसह ओळखीचे कोणीच दिसेना. त्यामुळे गर्दीतल्या एका कोपर्‍यात रडत थांबला होता.

चौकातील व्यापार्‍यांनी मुलाकडे चौकशीचा प्रयत्न केला; पण भीतीमुळे त्याच्या तोंडातून शब्दही फुटत नव्हते. त्याला खाऊ देण्यात आला; पण त्याने हातही लावला नाही. अंगावरील नवीन कपड्यांमुळे पालक मुलासमवेत विवाह सोहळ्यासाठी आले असावेत याची खात्री झाली. नागरिकांनी ठाणे अंमलदार हेगडे-पाटील यांच्याशी संपर्क साधून माहिती दिली. त्यानंतर हेगडे- पाटील यांच्यासह अन्य पोलिसांनी शोध सुरू केला.

मुलाच्या अंगठ्यावरून आधार कार्ड उपलब्ध करण्याचा प्रयत्न केला; पण यश आले नाही. पोलिसांच्या अथक प्रयत्नानंतर रात्री पालकांचा शोध लागला. आई-वडिलांना पाहताच चिमुरडा त्यांना बिलगला खरा; पण ‘पोलिसमामा…पोलिसमामा… म्हणत पुन्हा काहीकाळ त्यांच्याच कुशीत विसावला. हवालदार हेगडे-पाटील, संकपाळ, सूर्यवंशी यांच्यासह ठाण्यातील पोलिसांचे आभार व्यक्त करताना पालकांचे डोळे पाणावले होते.

Back to top button