गोवा राज्याला ड्रग्जमुक्त करणे माझे ध्येय : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत | पुढारी

गोवा राज्याला ड्रग्जमुक्त करणे माझे ध्येय : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

म्हापसा; पुढारी वृत्तसेवा : राज्यातील मोठे ड्रग्जचे छापे हे माझ्याच कारर्किदीत पडल्याचा दावा करीत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले की, माझ्या कार्यकाळात ड्रग्समधील गुंतलेल्यांना आता अटक होऊ लागली आहे. अनेक छोट्या-मोठ्या ड्रग्ज पेडर्लसना पोलिसांनी तुरुंगात डांबले आहे.

गोव्याला ड्रग्जमुक्त करणे हा माझा ध्येय असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले. वागातोर येथे ते माध्यमांशी बोलत होते. याशिवाय या बेकायदा व्यवहाराबाहेरील सर्व चांगल्या पर्यटनाचे आम्ही स्वागत करतो, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

गोव्यात विशेषतः किनारी भागांत ड्रग्जचा व्यवसाय फोफावला असून यासंदर्भात शिवोलीचे आमदार विनोद पालयेकर यांनी हल्लीच मुख्यमंत्र्यांना लेखी निवेदन सादर केले होते. यासंदर्भात विचारले असता मुख्यमंत्र्यांनी वरील वक्तव्य केले.

जो पाचलाख चौरस मीटर जागेत लाखो जमावाच्या उपस्थितीत सनबर्न महोत्सव व्हायचा, तो यावर्षी होणार नाही, असा पुनरुच्चार मुख्यमंत्र्यांनी केला. काहीजण सनबर्नचे नाव देऊन आपल्यामध्ये छोट्या पातळीवर पार्टी करतात. त्याला सनबर्न महोत्सव म्हणता येणार नाही. तो त्यांचा खाजगी इव्हेंट, असे स्पष्टीकरण डॉ. प्रमोद सावंत यांनी दिले.

म्हापशातील स्मार्ट सिटीबाबत प्रश्नावर मुख्यमंत्री म्हणाले की, याविषयी कोणीच निविदा सादर केली नव्हती. ती पुन्हा मागविली जाईल. याशिवाय रवींद्र भवनाचा विषय जागेवर घातला जाईल. जाग्यामुळे हा विषय रखडल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

Back to top button