पणजी; पुढारी वृत्तसेवा : ध्वनी प्रदूषणावर मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने बुधवारी चाप लावला. रात्री 10 नंतर ध्वनिक्षेपक सुरू राहिल्यास उपविभागीय जिल्ह्यधिकारी, प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि पोलिस अधिकार्यांनी कडक कारवाई करावी, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. आदेशाचे योग्य पद्धतीने पालन न झाल्यास पोलिसांनाही कारवाईस सामोरे जावे लागणार आहे.
उच्च न्यायालयाने ध्वनिक्षेपकांना रात्री दहापर्यंत परवानगी दिली आहे. मात्र, राज्यात ठिकठिकाणी या आदेशाचे सर्रास उल्लंघन होते, असा आरोप करत अॅड. कार्लोस फेरेरा यांनी उच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल केली होती. यासोबत त्यांनी संगीत रजनींच्या जाहिरातीही जोडल्या होत्या. यावर बुधवारी सुनावणी झाली. या जाहिरातींसंदर्भात न्यायालयाने पोलिसांना कोणती कारवाई केली याचा अहवाल देण्यास सांगितले.
राज्यातील अनेक हॉटेल्समध्ये रात्रभर कर्णकर्कश संगीत वाजवले जाते. विशेषतः किनारी भागातील हॉटेल्समध्ये मोठ्या आवाजात संगीत रजनींचे आयोजन केले जाते. यातील बहुतेक कार्यक्रम हे रात्री दहा वाजण्याच्या सुमारास सुरू होऊन पहाटेपर्यंत सुरू असतात. याबाबत वारंवार तक्रार करूनही पोलिस केवळ जुजबी कारवाई करत असल्याचा आरोप किनारी भागातील नागरिकांनी वेळोवेळी केला आहे.
हेही वाचा :