[visual_portfolio id="25936"]
पणजी; पुढारी वृत्तसेवा : गोव्यात प्रसिद्ध काजू फेणी संग्रहालय उभारण्यात आले आहे. स्थानिक व्यावसायिक नंदन कुडचडकर यांच्या कल्पनेतून काजू फेणी संग्रहालयाची कल्पना आकारास आली आहे. उत्तर गोव्यातील प्रसिद्ध अशा कळंगुट किनार्यापासून जवळ असलेल्या कांदोळी परिसरात या संग्रहालयाची उभारणी करण्यात आली आहे.
गोवा नेहमीच या वेगळ्या ओळखीमुळे देशी आणि विदेशी पर्यटकांसाठी आकर्षणाचे विशेष केंद्र राहिले आहे.
गोव्याची आणखी एक खास ओळख असलेल्या काजू पासून बनविले जाणारे मद्य तथा काजू फेणीचा जीवन प्रवास सांगण्यासाठी संग्रहालय तयार केले गेले आहे़, असे कुडचडकर यांनी 'पुढारी'शी बोलताना सांगितले.
देशातील अशा प्रकारचे पहिलेच अल्कोहोल संग्रहालय आहे. 'ऑल अबाऊट अल्कोहोल' असे नाव या संग्रहालयास दिले आहे. संग्रहालयाच्या प्रवेशद्वारावरील कमानीवरील नाव पाहिल्यानंतर संग्रहालयात काही हटके आहे याची अनुभूती येते.
काजूपासून बनवलेली दारु साठवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या कलाकृती मर्तबान जार (चिनी मातीपासून बनलेल्या गोलाकार भांड्याचा हा एक प्रकार आहे) तसेच पारंपरिक काचेची भांडी येथे पहायला मिळतात.