

नाशिक : पुढारी वृत्तसेवा ; नाशिकचे तत्कालीन पोलिस आयुक्त दीपक पाण्डेय यांच्या बदलीने महसूल विभागातील अधिकार्यांनी संयमाची भूमिका स्वीकारली आहे. त्यामुळे गेल्या महिनाभरापासून पोलिस आणि महसूल विभाग यांच्यातील वादावर पडदा पडणार आहे.
महसूल विभागातील अधिकारी हे आरडीएक्स असून, त्यांना प्रदान केलेले दंडाधिकार हे डिटोनेटरसारखे आहेत. त्यामुळे राज्यात जिवंत बॉम्ब कार्यरत असून, भू-माफिया त्यांचा हवा तसा उपयोग करीत असल्याचा आरोप दीपक पाण्डेय यांनी राज्याच्या पोलिस महासंचालकांना लिहिलेल्या पत्रात केला होता. हे पत्र व्हायरल होताच महसूल विभागातून त्याविरोधात तीव्र भावना उमटल्या होत्या.
महसूल विभागातील अधिकार्यांनी पाण्डेय यांच्याविरोधात विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांना पत्र देताना, त्यांनी बिनशर्त माफी मागण्याची मागणी केली होती. अन्यथा आंदोलनाचा इशाराही देण्यात आला होता. पण, पोलिसांनीच आंदोलनाला परवानगी नाकारल्याने या आंदोलनाची हवाच निघून गेली होती. दरम्यानच्या काळात महसूल अधिकार्यांनी राज्यभरात जिल्ह्याच्या ठिकाणी आंदोलनाची तयारी करताना मुंबईतील आझाद मैदानात पाण्डेय यांच्याविरोधात एल्गार पुकारण्याची तयारी केली होती. मात्र, तत्पूर्वीच पाण्डेय यांची बदली झाली. आयुक्त पाण्डेय यांच्या बदलीनंतर महसूल विभागातील अधिकार्यांनी आता संयमी भूमिका घेतल्याचे पाहायला मिळत आहे. ज्या व्यक्तीविरोधात आमचे आंदोलन होते, तीच व्यक्ती बदली होऊन गेल्याने आंदोलनाची फारशी गरज नसल्याचा सूर अधिकार्यांनी आळवला आहे.
नूतन आयुक्तांकडून अपेक्षा
नूतन पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी पदभार स्वीकारला आहे. गेल्या महिनाभरापासून महसूल व पोलिस विभाग यांच्यातील वाद बघता, नाईकनवरे यांच्याकडून दोन्ही विभागांत सौहार्द निर्माण करण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. त्यामुळे नाईकनवरे दोन्ही विभागांमध्ये चर्चेचा पूल बांधण्यासाठी पुढाकार घेणार का, हेच पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.