नेतेपदासाठी काँग्रेसमध्ये लॉबिंग

file photo
file photo
Published on
Updated on

पणजी ः पुढारी वृत्तसेवा :  विधानसभेच्या 2017 मधील निवडणुकीनंतर सर्वात मोठा पक्ष असूनही नेता निवड न झाल्याने काँग्रेस सत्तेपासून वंचित राहिली होती. यापासून कोणताही धडा काँग्रेसच्या नेत्यांनी घेतलेला नाही. आताही विरोधी पक्षनेतेपदावरून लॉबिंग सुरू झाले आहे. मुख्यमंत्रिपदावर डोळा ठेवून काँग्रेसमध्ये फेरप्रवेश केलेले महत्त्वाकांक्षी नेते मायकल लोबो यांनी सत्ता नाही, तरी निदान विरोधी पक्षनेतेपद आपल्याला मिळावे यासाठी दिल्लीत भेटीगाठी सुरू केल्या आहेत. लोबो यांची ही चाल दूरद‍ृष्टी ठेवून आहे.

काँग्रेसला या विधानसभा निवडणुकीत 11 जागांपर्यंच मजल मारता आली आहे. भाजपची 10 वर्षे सत्ता असतानाही सरकारविरोधातील नैसर्गिक नाराजी मतांत परिवर्तीत करण्यास काँग्रेसला यश आले नाही. संघटन कौशल्याच्या अभावी काँग्रेसचे नेते एकेकटे लढले. प्रमुख नेते सर्व मतदारसंघात प्रचारासाठीसुद्धा पोहोचले नाहीत. त्यामुळे काँग्रेसचे जे काही उमेदवार निवडून आले ते स्वबळावर असे मानता येतील असे आहेत. त्यामुळे त्यांना एकत्र ठेवण्यासाठी काँग्रेसने कोणतीही उपाययोजना केलेली नाही. विधानसभा निवडणुकीनंतरच्या पहिल्यावहिल्या मोर्चालादेखील सर्व आमदार फिरकले नाहीत, यावरून काँग्रेसच्या तंबूत काय चालले आहे, याची कल्पना येऊ शकते.

दोन टप्प्यांवर गटबाजी

काँग्रेसची ही गटबाजी दोन टप्प्यांवर आहे. गिरीश चोडणकर यांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर ते पद भरण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. चोडणकर यांचा पाच वर्षे पक्षात एकछत्री अंमल होता. त्यांनी दोन वेळा दिलेला पदाचा राजीनामा स्वीकारण्यात आला नव्हता, एवढे त्यांचे दिल्ली दरबारी वजन होते. त्यांनी मेघश्याम राऊत, जनार्दन भंडारी, अमरनाथ पणजीकर आदी तरुण नेत्यांना पुढे आणले. विधानसभा व लोकसभा निवडणूक लढवण्याची हौसही भागवून घेतली. त्यामुळे त्यांच्याविरोधात काँग्रेसमध्ये एक गट निर्माण झाला आहे. त्या गटाला संतृष्ट करण्यासाठी काँग्रेस पक्षश्रेष्ठींना आलेक्स सिक्वेरा आणि आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांना कार्याध्यक्षपदी नियुक्‍त करण्याची वेळ आली होती.

आता रेजिनाल्ड पक्षात नसले तरी खासदार फ्रान्सिस सार्दिन या चोडणकर विरोधी गटाचे प्रतिनिधित्व करणारे सिक्वेरा विधानसभेत पोहोचले आहेत. त्यांना प्रदेशाध्यक्ष करावे यासाठी चोडणकर विरोधी गट सक्रिय झाला आहे. दुसर्‍या बाजूने कॅप्टन व्हिरीएटो, आमदार संकल्प आमोणकर किंवा जनार्दन भंडारी यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपद सोपवण्यात यावे असे चोडणकर यांचे प्रयत्न आहेत.

लोकसभेच्या 2024 मधील निवडणुकीकडे आता काँग्रेसच्या नेत्यांचे डोळे लागून राहिले आहेत. त्या निवडणुकीत भाजपची पिछेहाट झाली तरच राज्यात सत्तांतर घडवून आणता येईल असे नियोजन आहे. त्याची तयारी म्हणून प्रदेशाध्यक्षपद, विरोधीपक्षनेतेपद हाताशी असावे यासाठी हा सारा खटाटोप सुरु झाला आहे. त्यातच काँग्रेसपासून दुरावलेले काही नेते पून्हा काँग्रेसमध्ये परतण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या काही महिन्यात काँग्रेसमध्ये संघटनात्मक पातळीवर बर्‍याच हालचाली दिसू शकतात. त्यातच खासदार रजनी पाटील यांनी निरीक्षक म्हणून दिलेल्या अहवालात काय दडले आहे याची माहिती बाहेर आलेली नाही. त्यावरही बरेच काही अवलंबून आहे. मात्र या सार्‍यातून काँग्रेसने कोणताही धडा मात्र घेतलेला दिसत नाही.

मायकल लोबो गटातून

प्रदेशाध्यक्षासोबत विरोधी पक्षनेते पदासाठीही काँग्रेसमध्ये शर्यत सुरू झाली आहे. मुख्यमंत्री होणे आपल्याला आवडेल, असे जाहीर विधान करणारे लोबो दिल्लीत पोहोचले आहेत. त्यांनी विविध नेत्यांच्या गाठीभेटी घेणे सुरू केले आहे. काँग्रेसने आता बदलले पाहिजे. तरुण नेतृत्व पुढे आणले पाहिजे असे कारण विरोधी पक्षनेतेपदी आपल्याला आणावे यासाठी लोबो पुढे करू लागले आहेत. पत्नी दिलायला आणि साळगावचे आमदार केदार नाईक लोबोंसोबत आहेत. राज्यात काँग्रेसची एकहाती सत्ता आणून दाखवतो, अशी त्यांनी मारलेली बढाई प्रत्यक्षात न उतरल्याने त्यांच्या शब्दाला दिल्लीच्या दरबारी राजकारणात किती किंमत राहिली असेल याविषयीही शंका आहे.

दिगंबर कामत गटातून

दिगंबर कामत यांच्यासोबत युरी आलेमाव (कुंकळ्ळी), राजेश फळदेसाई (कुंभारजुवे), संकल्प आमोणकर (मुरगाव), आल्टन डिकॉस्ता (केपे) असे आमदार आहेत. सध्या ते विरोधी पक्षनेतेपदी आहेत. ते भाजपमध्ये जाणार अशा कितीतरी चर्चा पाच वर्षात रंगल्या मात्र ते काँग्रेसमध्येच कायम राहिले आहेत. 17 पैकी शेवटी दोन आमदार शिल्लक राहिले होते त्यात कामत यांचा समावेश होता. निवडणूकपूर्व काळातच कामत यांनी आमदारांची निष्ठा आपल्यावर असेल असे नियोजन केले आहे. कामत यांना दुखावण्याचे राजकीय परिणामांची कल्पना काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींना असल्याने लोबो यांना सबुरीचा सल्ला मिळू शकतो.

निवड प्रक्रियेपासून दूर : गिरीश चोडणकर

गिरीश चोडणकर म्हणाले, प्रदेशाध्यक्षपद आणि विरोधी पक्षनेतेपद निवड या प्रक्रियेपासून मी दूर आहे. राजीनामा दिल्यापासून संघटनात्मक कामापासूनही दूर आहे. त्यामुळे कोणाचे कुठे कुठे प्रयत्न सुरू आहेत ते माहीत नाही. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी मला विचारले तरच मी याबाबतचे माझे मत व्यक्‍त करणार आहे, अन्यथा नाही. पक्षाचे काम पुढे नेण्यासाठी सर्वांना सोबत घेऊन जाणारे नेते या पदांवर असावेत, असे मला वाटते.

दिगंबर कामत म्हणाले, विरोधी पक्षनेतेपदी कोण असावा हा आमदारांचा अधिकार आहे. सर्वसाधारणपणे दिल्लीतून निरीक्षक येतात आणि आमदारांचे म्हणणे ऐकून घेतात आणि एकमताने नेत्याची निवड केली जाते. त्यासाठी लॉबिंगची गरज आहे, असे मला वाटत नाही. कोण दिल्लीत यासाठी प्रयत्न करत आहे, याची मला माहिती नाही. पक्षश्रेष्ठी व आमदार यांच्या ज्यांना पाठिंबा तोच विरोधी पक्षनेतेपदी असेल.

हेही वाचलंत का? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news