Dairy animals : दुभत्या जनावरांचे उन्हाळ्यातील व्यवस्थापन | पुढारी

Dairy animals : दुभत्या जनावरांचे उन्हाळ्यातील व्यवस्थापन

हळूहळू हवेतील उष्मा वाढत चालला आहे. उन्हाळा सुरू झाला की शेतीनियोजनात जसे बदल करावे लागतात तसेच पशुव्यवस्थापनातही काही बदल करून काळजी घेणे गरजेचे ठरते. खासकरून उन्हाळ्यात गायी-म्हशींच्या व्यवस्थापनाकडे जास्त लक्ष देणे गरजेचे आहे.

उन्हाळ्यात जनावरांना पाण्याची गरज जास्त असते; परंतु पाण्याचे तापमान जास्त असेल तर जरुरीपेक्षा कमी पाणी प्यायले जाते. त्यामुळे दूध उत्पादनात घट होते. यासाठी पाण्याची साठवण आणि पाणी पिण्याची व्यवस्था सावलीत करावी. शक्य असल्यास इतर मार्गांनी पाणी थंड करून द्यावे. गायी-म्हशींना पाणी देताना ठराविक दोन आणि तीन वेळा पाणी पाजण्यापेक्षा दिवसभर पाण्याची उपलब्धता होईल असे पाहावे. यामुळे गायी अधिक दूध देताना आढळतात. त्यामुळे सर्व जनावरांची एकूण गरज लक्षात घेऊन 24 तास पिण्याचे पाणी मिळू शकेल, अशी व्यवस्था करावी.

जनावरांना पाजावयाचे पाणी हे शक्यतो स्वच्छ असावे. जेणेकरून अस्वच्छ पाण्यामुळे जनावर आजारी पडणार नाही आणि पुढील आजारावरचा खर्च कमी होईल. तसेच पाण्याच्या गव्हाणीची उंची ही प्रत्येक जनावरास आरामात पाणी पिता येईल अशी ठेवावी. दुधातील गायी तसेच गाभण गायी यांना भाकड गायीपेक्षा अधिक पाण्याची आवश्यकता असते. त्यामुळे प्रत्येक जनावराच्या वैयक्‍तिक गरजेनुसार पाण्याची व्यवस्था करावी. तसेच उन्हाळ्यात तापमान वाढते म्हणून गोठ्याचे योग्य व्यवस्थापन करावे. त्यासाठी गोठ्यात फॉगर्स लावावेत. गायी-म्हशींना थंड पाण्याने धुवावे.
– सतीश जाधव

Back to top button