कोल्हापूर : शाळा 30 एप्रिलपर्यंत सुरू ठेवण्याच्या आदेशास विरोध | पुढारी

कोल्हापूर : शाळा 30 एप्रिलपर्यंत सुरू ठेवण्याच्या आदेशास विरोध

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

पहिली ते नववीपर्यंतच्या शाळा 30 एप्रिलअखेरपर्यंत सुुरू ठेवण्याच्या शिक्षण विभागाच्या आदेशास जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ, मुख्याध्यापक संघ, शिक्षक संघटनांनी विरोध दर्शविला आहे. शैक्षणिक अभ्यासक्रम पूर्ण झाला असून एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात 1 ली ते 9 वीच्या परीक्षा सुरू होतील. निर्णयामुळे पुढील शैक्षणिक नियोजन कोलमडण्याची शक्यता आहे. उन्हाळी सुट्टी लांबणीवर जाईल. दहावी, बारावी परीक्षा पेपर तपासणीवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

शाळांनी अभ्यासक्रम पूर्ण केला असून परीक्षेची तयारी सुरू आहे. अशावेळी हा आदेश काढणे चुकीचे आहे. परिणामी, दहावी, बारावी परीक्षा पेपर तपासणी नियोजित वेळेत होणे अशक्य आहे. या निर्णयास विरोध राहील.
– एस. डी. लाड,
सभाध्यक्ष शैक्षणिक व्यासपीठ

शैक्षणिक सत्र सुरू झाल्यापासून शाळा पूर्ण क्षमतेने सुरू आहेत. या निर्णयाने उन्हाळी सुट्टी, शालेय निकाल तयार करण्यात अडचणी येतील. सुट्ट्यांचा ताळमेळ बसविणे अवघड होईल.
– दत्ता पाटील,
सचिव, जिल्हा मुख्याध्यापक संघ.

शाळांचे नियोजन ठरलेले असते. परीक्षेची तयारी पूर्ण झाली आहे. या निर्णयाने वेळापत्रक कोलमडेल. याचा विचार करून शासनाने निर्णयाचा फेरविचार करावा.
– वसंतराव देशमुख, अध्यक्ष, कोल्हापूर. जिल्हा शिक्षण संस्था संघ.

शासनाने हा निर्णय उशिरा घेतला आहे. उन्हाची तीव—ता पाहता दिवसभर शाळा सुरू ठेवणे जिकिरीचे आहे. परीक्षेचे नियोजनाचे कामकाज सुरू आहे. ऐनवेळी घेतलेला निर्णय अडचणीचा आहे.
– सुधाकर सावंत, राज्य प्रमुख, नपा,
मनपा राज्य प्राथमिक शिक्षक समिती.

एप्रिल महिन्यात नववीची परीक्षा सुरू होणार आहे. परीक्षा वेळेत न झाल्यास उन्हाळ्यात दहावीचा अभ्यास करण्यास कमी वेळ मिळेल. शासनाने निर्णयाचा फेर विचार करावा. – रिया कळके, केर्ली

शाळांचा अभ्यासक्रम पूर्ण झाला असताना हा निर्णय आताच का घेतला हे समजत नाही. यास संघटना म्हणून विरोध राहील. सकाळच्या सत्रात शाळा सुरू ठेवाव्यात.
– प्रसाद पाटील, राज्याध्यक्ष, पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटना

Back to top button