मोबाइल नंबर बदलताय? सावधान! बँक खात्यातील रक्कम होऊ शकते लंपास | पुढारी

मोबाइल नंबर बदलताय? सावधान! बँक खात्यातील रक्कम होऊ शकते लंपास

नाशिक : सतीश डोंगरे
बर्‍याचदा मोबाइल बंद झाला, हरवला किंवा अन्य कारणांमुळे मोबाइल नंबर बदलला जातो. पण इतक्या सहजासहजी नंबर बदलणे खरेच योग्य आहे काय? याचा जर कोणी विचार करत नसेल, तर त्याला मोठा फटका बसू शकतो. होय, हल्ली आधार कार्डपासून ते बँकेपर्यंत मोबाइल नंबर लिंक करावा लागत असल्याने, मोबाइल नंबर बदलताना प्रचंड सावधगिरी बाळगावी लागणार आहे.

मोबाइल नंबर बदलल्याने एका महिलेच्या बँक खात्यातून तब्बल आठ लाख 16 हजार रुपये लंपास केल्याचा संदेश सध्या समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे. वास्तविक या महिलेने तिच्या बँक खात्याशी जो मोबाइल नंबर लिंक केला होता, तो तिने जवळपास चार वर्षे वापरला नव्हता. पण हा नंबर बँकेच्या केवायसीमधून हटविण्याबाबतही तिने बँकेला कळवले नव्हते, तर दुसरीकडे नंबर वापरात नसल्याने, सिम कार्ड कंपनीने तो नंबर दुसर्‍या ग्राहकाला हस्तांतरित केला. त्या महिलेनेदेखील त्याकडे दुर्लक्ष केले. तसेच सिम बंद झाले म्हणून तिने लगेचच दुसर्‍या क्रमांकाचे सिम खरेदी केले. याबाबतचीही कुठलीच माहिती तिने बँकेला दिली नाही. पुढे असे झाले की, त्या महिलेच्या बँकेचे सर्व एसएमएस नोंद केलेल्या मोबाइल नंबरवर जाऊ लागले. त्यामुळे ज्याला त्या महिलेचा नंबर दिला गेला, त्याच्यापर्यंत त्या महिलेच्या सर्व बँकेचे डिटेल्स एसएमएसच्या माध्यमातून पोहोचू लागले.

पुढे त्या व्यक्तीने एसएमएसमधील बँकेच्या लिंकवर क्लिक करून बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर प्रवेश केला. ‘फरगेट पासवर्ड’ टाकून त्याने बँकेचा ओटीपी त्याच्या ताब्यात असलेल्या मोबाइल नंबरवर मिळवला. पुढे इतर औपचारिकता पूर्ण करून त्याने इंटरनेट बँकिंगद्वारे खात्यातील तब्बल 8 लाख 16 हजार रुपये काढून घेतले. सध्या हा संदेश समाजमाध्यमांवर सर्वत्र व्हायरल होत आहे.

परिणामी, मोबाइल नंबर बदलताना किंवा वापरात नसलेला किंवा बंद असलेला जुना मोबाइल नंबर आपण कोठेही लिंक केला आहे काय, याची खातरजमा करायलाच हवी. तसेच बँकिंग नियमानुसार बँकेत जाऊन तो नंबर डिलिट करण्याबाबतची प्रक्रिया पूर्ण करावी. अन्यथा अशा प्रकारे फसवणूक होऊ शकते.

सिम कार्ड कंपनीचे धोरण
मोबाइल सिम कार्ड कंपनीच्या पॉलिसीनुसार जर कोणताही नंबर सहा महिन्यांपर्यंत वापरला गेला नसेल, तर तो दुसर्‍या ग्राहकाला हस्तांतरित करण्याचा अधिकार त्यांच्याकडे असतो. त्यामुळे जर तुमचा मोबाइल क्रमांक सहा महिन्यांपेक्षा अधिक काळ बंद असेल, तर तो सुरू आहे की बंद, याबाबतची तत्काळ खातरजमा करून घ्यावी.
मृतांच्या मोबाइलबाबत बँकेला कळवा कुटुंबातील एखादी व्यक्ती मृत झाल्यानंतर तिच्या मोबाइल नंबरकडे बर्‍याचदा दुर्लक्ष केले जाते. पण ही बाब धोकादायक ठरू शकते. त्यामुळे मृत व्यक्तीच्या मोबाइल नंबरची माहिती तत्काळ बँकेला कळवायला हवी.

जुना मोबाइल नंबर बंद करून नव्या नंबरच्या अपडेशनची प्रक्रिया बरेच ग्राहक ऑनलाइन पद्धतीनेच पार पाडण्यावर भर देतात. मात्र यात जोखीम असल्याने, ग्राहकांनी प्रत्यक्ष बँकेत जाऊन नव्या नंबरबाबतची नोंद बँकेत करायला हवी. तसेच तत्काळ कॉल सेंटरलाही याबाबतची माहिती द्यायला हवी.
– सुधीर जोशी,
बँक व्यवस्थापक

हेही वाचा :

Back to top button