कोल्हापूर : मजले येथील सर्पकुहर : एक पुरातत्त्वीय संचित | पुढारी

कोल्हापूर : मजले येथील सर्पकुहर : एक पुरातत्त्वीय संचित

कोल्हापूर : श्रीराम ग. पचिंद्रे
प्राचीन काळातील अनेक गूढ भौगोलिक संरचना आजही मानवाला अचंबित करून टाकतात. हातकणंगले तालुक्यातील मजले गावातील डोंगराळ भागात डोंगर पठारावर सप्‍त वर्तुळाकार दगडी संरचना ही कोकण आणि घाटमाथ्यावरच्या भागातील इसवी सनापूर्वीच्या व्यापारी मार्गावर प्रकाशझोत टाकतात. या संरचना पुरातत्त्वीय इतिहासाचे संचित असून, त्यांचे संरक्षण आणि संवर्धन होणे आवश्यक आहे. गोव्यातील इतिहास संशोधक पर्यावरण अभ्यासक प्रा. राजेंद्र केरकर यांनी या संरचनेची पाहणी करून त्यावर प्रकाशझोत टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे. याविषयी एक अभियान नुकतेच पार पडले.

अभ्यासकांकडून देशाच्या प्राचीन इतिहासाचा नव्याने शोध घेण्याचे कार्य

जयसिंगपूरपासून हातकणंगले- शिरोळ तालुक्यांच्या सीमेवर डोंगरपठारावर सप्‍त वर्तुळाकार अशी सर्पकुहराशी साम्य दाखवणारी दगडी संरचना आहे. शेकडो वर्षांपासून या परिसरातील मानवी समाजाने दगडी संरचनेतून घातलेले हे कोडे असल्याचे जाणले होते. बालपणापासून तिथे लक्ष्मी पठारावर मेंढ्या चरायला नेत असताना या संरचना पाहिल्या असल्याचे मायाप्पा पुजारी या वृद्धाने सांगितले. अशा प्रकारच्या सर्पकुहरसद‍ृश दगडी संरचना इतिहास आणि प्राचीन संस्कृतीच्या अभ्यासकांना मार्गदर्शक ठरणार असल्याचे अभ्यासक सचिन पाटील म्हणतात. विशेष संशोधन केल्यानंतर असे लक्षात येते की, या संरचना भारत- रोम दरम्यान इसवी सनापूर्वीपासून चालू असलेल्या व्यापार आणि व्यवहारावर प्रकाश टाकतात. जयसिंगपूर येथील पर्यावरण कार्यकर्ते व अभ्यासक सर्वदमन कुलकर्णी, मालोजी माने, हनुमंंत न्हावी आणि अक्षय मगदूम, सीताराम तोरस्कर, विठ्ठल शेळके, गजानन शेट्ये, विठोबा गावडे हे प्रा. केरकर यांच्यासमवेत अभियानात सामील झाले होते.

वर्तुळाकार दगडी संरचनेचे संरक्षण आणि संवर्धन होणे आवश्यक

या सर्पकुहरसद‍ृश प्रस्तररेखा चित्रकृती गोव्यात कुशावती नदीच्या काठी रिवण-फणसायमळ येथेही आढळलेली आहे. तसेच मणेराजुरी, वशी या ठिकाणीही अशा संरचना आहेत. या संरचना कृष्णा नदी खोर्‍यातल्या आणि घाटमाथ्यावरच्या गावांचा ऐतिहासिक रामघाट मार्गातून प्राचीन काळी पश्‍चिम किनारपट्टीवरून होणार्‍या व्यापारावर प्रकाशझोत टाकणार्‍या महत्त्वाचा दुवा ठरणार आहेत. तसेच मानवी समाजाच्या अगम्य इतिहास आणि संस्कृतीच्या अभ्यासकांच्या द‍ृष्टीने महत्त्वाच्या आहेत. अशा सर्पकुहर संरचनांचा शोध आता सर्वत्र घेतला जात आहे. त्याच्या सहाय्याने देशाच्या प्राचीन इतिहासाचा नव्याने शोध घेण्याचे कार्य अभ्यासक करीत आहेत.

‘सर्पकुहर’ ही प्राचीन संरचना देशाच्या संस्कृतीवर प्रकाशझोत टाकणारी आहे. जगात स्टोनहेंज आणि तत्सम ज्या काही संरचना आहेत, त्या असं म्हणतात की, परग्रहावरील मानवांनी केलेल्या आहेत, असं मानलं जातं. पण त्यामागे काय आहे, त्यांचे प्रयोजन काय होतं? याचा नव्या द‍ृष्टीने शोध घ्यायला हवा. मजले येथील सर्पकुहरसद‍ृश संरचना या पुरातत्त्वीय द‍ृष्टीने अभ्यासण्यासारख्या आहेत.
– उमाकांत राणिंगा, मंदिर रचना व मूर्तिशास्त्र अभ्यासक

मजले येथे लक्ष्मी पठारावर सापडलेले सर्पकुहर आणि सातारा परिसरात सापडलेले सर्पकुहर यांच्यात साधर्म्य असून, या दगडी संरचनांच्या शोधामुळे कोकण आणि घाटमाथ्यावरच्या व्यापारी मार्गाच्या इतिहास आणि संस्कृतीच्या संशोधनाला नवी दिशा आणि दुवे लाभणार आहेत. इतिहासाच्या उदरात गडप झालेली बरीच सत्ये आगामी काळात प्रकाशात येणार आहेत.
प्रा. राजेंद्र केरकर, गोवा, पुरातत्त्व आणि पर्यावरण अभ्यासक

Back to top button