गोवा : भिकार्‍यांचे करायचे काय?; नागरिक त्रस्त | पुढारी

गोवा : भिकार्‍यांचे करायचे काय?; नागरिक त्रस्त

मडगाव ः पुढारी वृत्तसेवा ; शहरातील भिकार्‍यांचा प्रश्‍न पुन्हा ऐरणीवर आला आहे. कोरोनाची स्थिती नियंत्रणात आल्यानंतर शहरात परप्रांतीय भिकार्‍यांचे लोंढेच्या लोंढे उतरू लागले आहेत. यावर नियंत्रण आणावे, अशी मागणी होत आहे.

दोन वर्षांच्या तान्हुल्या बाळालासोबत घेऊन फिरणार्‍या महिलांसह वृद्ध भिकारीही ठिकठिकाणी भीक मागताना दिसून येत आहेत. पालिका उद्यान, कोलवा सर्कल, गांधी मार्केट, जुने रेल्वे स्थानक, आके आणि पाजीफोंड भागातील रस्त्यालगत शेकडोंच्या संख्येने भिकारी भीक मागताना दिसून येत आहेत. येथील रेल्वे स्थानकावर मोठ्या प्रमाणात परप्रांतीय भिकारी आपल्या कुटुंबासह उतरू लागले आहेत. ते रस्त्यावर येऊन भीक मागण्यापूर्वी त्यांच्यावर नियंत्रण ठेवावे, अशी मागणी मडगाव वासियांनी केली आहे.

कोलवा सर्कलजवळ परप्रांतीय कुटुंबांनी आपला तळ ठोकून महिना उलटला आहे. एसजीपीडीए मैदानावर मोठ्या संख्येत तंबू ठोकून वास्तव्य करणारे परप्रांतीय आपल्या लहान मुलांना घेऊन सिग्नलवर भीक मागू लागले आहेत. भीक मागण्यासाठी वाहनासमोर येणारी मुले वाहनचालकांसाठी डोकेदुखी ठरत आहेत. पोलिस कारवाई करत नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्‍त केली आहे.

याबाबत गोवा कॅनचे निमंत्रक रोलांड मार्टिन यांनी सांगितले, की भिकार्‍यांना जिल्ह्यात आसरा मिळावा अशी तरतूद गोवा, दमण आणि दीव भीक मागणे प्रतिबंधक कायदा 1972 मध्ये आहे. ती लागू केली जावी. मडगावात भीक मागणार्‍यांचा परिणाम रस्ता सुरक्षा आणि वाहतूक व्यवस्थापनावर होत आहे.

लहान मुलांसह वृद्धही वाहतूक सिग्नलवर थांबून भीक मागत आहेत. त्यांचा परिणाम वाहनचालक आणि दुचाकीस्वारांना होत आहे. जुन्यामार्केट जवळच्या सिग्नलवर विंडस्क्रीन शील्ड आणि मोबाईल फोन स्टॅण्ड यासारख्या विविध वस्तूंची विक्री करताना परप्रांतीय आढळून येत आहेत.

संयुक्‍त बैठक व्हावी

पोलिसांनी या समस्येचे निवारण करण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, त्यांना संबंधित संस्थांकडून समर्थन आणि पाठपुरावा करण्याशी संबंधित समस्यांचा सामना करावा लागतो. कृती आराखडा तयार करण्यासाठी जिल्हा पोलिस, वाहतूक पोलिस, मडगाव पालिका, समाज कल्याण संचालनालय, महिला व बाल विकास संचालनालय आदी सर्व संबंधित यंत्रणांसोबत संयुक्‍त बैठक बोलाविण्याची मागणी मार्टिन यांनी केली आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button