नवी दिल्ली : वृत्तसंस्था
भारतातील जवळपास 20 हजार विद्यार्थी युक्रेनमध्ये एमबीबीएसचे शिक्षण घेत आहेत. एवढ्या मोठ्या संख्येने विद्यार्थी युक्रेनमध्येच वैद्यकीय शिक्षणासाठी का जात असावेत? याविषयी…
येथील खासगी महाविद्यालयांची एमबीबीएसची फी भारतातील महाविद्यालयांच्या तुलनेत अत्यंत अल्प आहे. भारतासह अमेरिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि कॅनडा या देशांत हा खर्च 1 ते 8 कोटींच्या घरात जातो. परंतु, युक्रेनमध्ये कोणत्याही महाविद्यालयातून एमबीबीएसची पदवी केवळ 25 लाखांत पूर्ण करता येते. त्यामुळे अनेक देशांतील हजारो विद्यार्थी युक्रेनमध्ये एमबीबीएससाठी जातात.
भारतात दरवर्षी एमबीबीएसच्या केवळ 88 हजार जागा उपलब्ध होतात. त्यामुळे अनेक विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहतात. दरवर्षी जवळपास 8 लाखांहून अधिक विद्यार्थी प्रवेश परीक्षा देतात. त्यापैकी केवळ 88 हजार विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्याची संधी मिळते. तर यापैकीच काही विद्यार्थी युक्रेनसारख्या देशात शिक्षण घेण्याचा मार्ग निवडतात.
युक्रेनमधील वैद्यकीय शिक्षण स्वस्त आणि दर्जेदार आहे. तसेच येथील अभ्यासक्रमाला जागतिक मान्यता आहे. भारतात युक्रेनमध्ये घेतलेल्या एमबीबीएसच्या पदवीला मान्यता आहे. भारतात फॉरेन मेडिकल ग्रॅज्युएट एक्झामिनेशन उत्तीर्ण झाल्यानंतर नोकरीची हमखास संधी मिळते. युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षणाचा कालावधी सहा वर्षांचा आहे. पीसीबी विषयासह 12 वीत 50 टक्के गुणांनी उत्तीर्ण आणि नीट स्कोअरकार्ड असणे आवश्यक आहे. यासाठी 3,500 ते 5,000 इतकी अमेरिकन डॉलर्स फी असते.